
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
दारणा, गंगापूर च्या पाणलोटात काल पावसाने काहिसा कानाडोळा केला. मात्र अधूनमधून बुरबूर येत होती. दरम्यान भावलीमध्ये दोन दिवसांत 31 दलघफू, पालखेड मध्ये 18 दलघफु नवीन पाणी दाखल झाले आहे. अन्य धरणात कोठेही पाण्याची आवक झालेली नव्हती.
काल दिवसभर पाऊस नसल्यात जमा होता. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ व पाणलोटातील घोटीला शून्य पावसाची नोंद आहे. तर इगतपुरीला 15 मिमी पाऊस झाला. भावलीला रिपरिप येत होती. तेथे रविवारी सकाळी सहा पर्यंत मागील 24 तासांत 19 मिमि पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून तेथे 320 मिमी पाऊस झाला. दोन दिवसांपासून उपयुक्त साठा शुन्य असलेल्या या धरणात 31 दलघफू नवीन पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे काल सकाळी या धरणाचा साठा 2.16 टक्के इतका झाला होता.
काल दिवसभर गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाची उघडीप होती. मात्र काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरला 10 मिमी, कश्यपीला 2 मिमी, त्र्यंबकला 1 मिमी, अंबोलीला 19 मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये कालच्या तारखेला 23.11 टक्के उपयुक्त साठा होता. काल 17.04 टक्के इतका होता. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्याला धुव्वाधार पावसाची गरज आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात काल दुपारनंतर पावसाने काही वेळ मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात सोनेवाडीला 36 मिमी, शिर्डी 8 मिमी, राहाता 2 मिमी, असा पाऊस नोंदला गेला.
मुळा पाणलोटात दमदार हजेरी
कोतूळ |वार्ताहर| Kotul
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा पाणलोटात काल रविवारी दुपारी 4 वाजेपासून पावसाने दमदार हजेरी दिली हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, पैठण, आंभोळमध्ये काल पावसाच्या सरी जोरदार कोसळत होत्या. त्यामुळे या भागातील ओढेनाले सक्रिय झाले आहेत. या भागात पहिल्यांदाच चांगला पाऊस पडत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.. शेतकरी मशागत आणि अन्य शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.