आमदारांनी डोक्यातील भ्रम काढून टाकावा - वाकचौरे

आमदारांनी डोक्यातील भ्रम काढून टाकावा - वाकचौरे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उरली सुरली सहानुभूती गमावली आहे. तुमच्या हातून उदघाटन झाले म्हणजे जनता डोक्यावर घेईल हा भ्रम डोक्यातून काढून टाका, जनतेला कोण काम करतो आणि कोण स्टंटबाजी करतो हे चांगलेच माहिती झाल्याची खोचक टिका भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

अकोले तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व सामाजिक संस्था, व्यक्तींच्या प्रयत्नातून सुगाव येथे कोविड सेंटर ऑक्सिजन बेड सहित उभे राहिले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा तालुक्याचे भूषण समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख व अकोले तालुक्याचे नाव देश पातळीवर नेणार्‍या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे या दोन मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

आमदार डॉ.लहामटे निवृत्ती महाराज देशमुख व राहीबाई पोपेर यांच्या येण्याची वाट न पाहता नेहमीच्या स्टाईलने स्टंटबाजी करीत स्वतः फित कापून मोकळे झाले. जर तुम्हाला वेळ नव्हता तर यायचे कशाला? तुम्हाला उपोषणाला बसलेल्या व्यक्तींची काळजी होती तर ते तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत. तुम्ही तीन दिवस काय करीत होते. किंवा सकाळी जाऊन उपोषण सोडून का आले नाही? तुम्हाला यायला उशीर झाला असता आणि तुम्ही येण्याच्या आधी उद्घाटन झाले असते तर तुमचं म्हणणं जनतेला कळलं असत.

या कार्यक्रमानंतर शिवसेनेचे नेते महेश नवले यांनी यात कोणीही राजकारण करू नये असे सांगितले. झालेला प्रकार निंदनीय आहे असेही ते म्हणाले. आम्हाला पण वाटलं की राजकारण करू नाही. हे मोठे काम होत आहे. ते अतिशय उपयुक्त आहे. अन याला राजकीय वास यायला नको. असच आम्हाला वाटत होतं. शिक्षक समन्वय समितीचे सदस्य घनश्याम माने यांनी राजकीय व्यक्तींनी अहंकार बाजूला ठेवा असे म्हटले आहे. पण आमदार तुमच्या मनातील अहंकार कधी दूर होणार, असा सवाल वाकचौरे यांनी केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com