गावातील माणूस 100 वर्ष जगला पाहिजे असे काम सरपंचांनी करावे - पेरे

गावातील माणूस 100 वर्ष जगला पाहिजे असे काम सरपंचांनी करावे - पेरे

अकोले |प्रतिनिधी| Akole

गावातील माणूस 100 वर्ष जगला पाहिजे याची काळजी सरपंचाने घेतली पाहिजे. लोककल्याणासाठी गावाचा एकेक पैसा खर्च झाला पाहिजे, गावाचा विकास सर्वांनी मिळून करायचा आहे. सरपंच नवीन असेल तर गावातील लोकांनी समजून घ्यावे, तो चुकत असेल तर त्याला चुकल्याची जाणीव करून द्या. मात्र वारंवार चूक करत असेल तर त्याला मात्र बुटाने हाणा, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ग्रामपंचायतचा टॅक्स आधी भरा मगच गावचा विकास होईल. प्रत्येक गावाने आर्थिक सूत्र समजून घ्यावे, समाजाला समजून घ्या मगच देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले.

युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेच्यावतीने अकोले तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या ज्येष्ठ नेते, सामाजिक संस्था, सरपंच, आदर्श शेतकरी, पत्रकार, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा विठ्ठल लॉन्स व मंगल कार्यालय येथे पाटोदाचे सरपंच पेरे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर होते. यावेळी उत्कर्षाताई रुपवते, शर्मिला येवले, ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले, वसंतराव देशमुख, प्रकाशराव मालुंजकर, लालूशेठ दळवी, अ‍ॅड. के. बी. हांडे, विठ्ठलराव चासकर, दीपक महाराज देशमुख, उद्योजक नितीन गोडसे, विनोद हांडे, प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी, सचिन शेटे आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते झुंबरराव आरोटे, कॉ. अ‍ॅड. शांताराम वाळुंज यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला तर सामाजिक कार्याबद्दल रोटरी क्लब अकोले, जाणता राजा प्रतिष्ठान या संघटनांना सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संस्था, सरपंच, शेतकरी, पत्रकार, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्री. पेरे पाटील म्हणाले, जोपर्यंत आपण आपले काम स्वतः करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्या गावचा व घराचा विकास होणार नाही. कोविड काळात खेड्यात मृत्युचे प्रमाण कमी आहे मात्र शहरात हे प्रमाण जास्त आहे. कारण खेड्यात झाडे आहेत. वृक्षारोपण, मुलांचे शिक्षण, गावची स्वच्छता, पाणी पुरवठा ही जबाबदारी ग्रामपंचायतने पार पाडली पाहिजे.

गावात सप्ताह जरूर घाला, सप्ताह ही एक कार्यशाळा आहे. पण उर्वरित 358 दिवस सप्ताहात ऐकल्या प्रमाणे वागा, असा सल्लाही पेरे पाटील यांनी उपस्थितांना दिला. आ. डॉ. किरण लहामटे यांनी कोविड काळात शिक्षक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, व सरपंच आदींनी चांगली काम केले. अकोले येथे जिल्हा उप रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. 60 टक्के रस्ते दोन वर्षात सुधारविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बी. जे. देशमुख, डॉ. अजित नवले, अ‍ॅड. वसंतराव मनकर आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेशराव नवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देशमुख यांनी केले तर आभार सेक्रेटरी निलेश तळेकर यांनी मानले. संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले, युवक-विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल पवार, सदस्य स्वप्निल नवले, सुनिल पुंडे, रवी नवले, वैभव सावंत, शुभम आंबरे, दीपक वैद्य, रवींद्र जगदाळे, वैभव सावंत, भरत नवले, योगेश राक्षे, रावसाहेब भोर आदींनी परिश्रम घेतले.

पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी आपल्या भाषणात, कोंभाळणे या आपल्या गावी भेटीसाठी राज्यभरातून लोक येत असतात. या लोकांनी अनेक वेळा पद्मश्री च्या तालुक्यातील गावच्या खराब रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अकोले तालुक्याचे नाव खराब होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोंभाळणे गावच्या खराब रस्त्याचे कामे लवकर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.

Related Stories

No stories found.