देवगड परिसर विकासाची यशवंतराव गडाखांची परंपरा ना. गडाखांनी जपली - भास्करगिरी

देवगडफाटा ते देवगड पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाचे भूमिपूजन
देवगड परिसर विकासाची यशवंतराव गडाखांची परंपरा ना. गडाखांनी जपली - भास्करगिरी

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

सुरुवातीच्या काळात देवगड येथे येण्यासाठी रस्ता नसायचा त्यावेळेस प्रथम डांबरी रस्ता मंजूर करून अतिथी भक्तांसाठी पहिले रेस्ट हाऊस यशवंतराव गडाख यांनी देवगडला मंजूर केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांची परंपरा ना. शंकरराव गडाख पुढे चालवत आहेत असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील देवगड फाटा ते श्रीक्षेत्र देवगड या पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महंत भास्करगिरीजी महाराज म्हणाले, ना. शंकरराव गडाख यांना माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांच्या कार्याचा वारसा लाभलेला आहे. राजकारण, धर्मकारण, समाजकारण या तिन्हीच्या माध्यमातून त्यांनी बंधुत्व निर्माण करण्याचे काम केले. समाजाला कामाच्या माध्यमातून सुखी करण्यासाठी मंत्रीपदासारखी शक्ती आवश्यक असते ती आपल्या तालुक्याला ना. गडाखांच्या रूपाने लाभली आहे. यातून तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. गडाख साहेबांनी श्रीक्षेत्र देवगड देवस्थान परिसरात चांगल्या प्रकारे विकासकामे केली आहेत.

सुरुवातीच्या काळात देवगड येथे येण्यासाठी रस्ता नसायचा त्यावेळेस प्रथम डांबरी रस्ता मंजूर करून अतिथी भक्तांसाठी पहिले रेस्ट हाऊस त्यांनीच देवगडला मंजूर केले असे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कार्याला उजाळा दिला. ना गडाख हे मंत्री असले तरीही ते नेवासा तालुक्यासाठी पालकमंत्री म्हणूनच काम करतात. ज्याप्रमाणे माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांनी सर्वसमावेशक विकासाचे काम केले त्याच पद्धतीने त्यांच्या कार्याचा वारसा घेत ना गडाख हे काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

श्री क्षेत्र देवगडचा रस्ता दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तो गुणवत्तापुर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करून घेणार असल्याची ग्वाही देत बंधुत्वाच्या भावनेतून व मंत्री पदाच्या माध्यमातून काम करत रहाणार असा निर्धार ना शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. ना. शंकरराव गडाख म्हणाले, करोनाच्या संकटकाळात ही नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी पहिल्या बजेट मध्ये 100 कोटी तर दुसर्‍या बजेट मध्ये 50 कोटी रुपयांचा निधी 44 रस्त्यांसाठी मंजूर करून आणला. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे जमिनीवरच असले पाहिजे तीच भूमिका माझी असून तालुक्यातील 350 किलोमीटर रस्त्याचा मास्टर प्लॅनही तयार केलेला आहे. रस्ता करताना अडवणूक नको यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. विकासकामे करण्यासाठी मला जनतेची साथ आवश्यक आहे. रस्ता कामांसाठी कितीही अडचणी आल्या तरी मी रस्ते पूर्ण करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.

अ‍ॅड. बापूसाहेब गायके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी गणेश भोरे, प्रा. बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ शेळके, बजरंग विधाते, रामनाथ महाराज पवार यांनी मनोगतातून ना शंकरराव गडाख यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

देवगड भक्तपरिवाराच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, अजय साबळे, महेश मते आदींनी ना शंकरराव गडाख यांचा सत्कार केला.

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, रामनाथ महाराज पवार, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले, मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के व्यासपीठावर उपस्थित होते.

रस्त्यात अडथळे नकोत, विचारांचे रुंदीकरण करा...

समाजाला कामाच्या माध्यमातून अडचणी सोडविण्यासाठी मंत्रिपदासारखी शक्ती आवश्यक असते. ती आपल्या तालुक्याला ना. गडाखांच्या रूपाने लाभली आहे. यातून तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागत आहे व यापुढेही अनेक कामे होणार आहेत. ‘रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण करू नका, विचारांचे रुंदीकरण करा’ असे आवाहन महंत भास्कगिरी महाराज यांनी यावेळी केले .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com