किसान-कामगारांचा रास्ता रोको

भारत बंद | केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींसाठी धार्जीणे असल्याचा आरोप
किसान-कामगारांचा रास्ता रोको

अहमदनगर | प्रतिनिधी

देशातील मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावले जात असल्याचा आरोप करत शेतकरी व कामगार संघटनांनी सोमवारी आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि विविध कामगार संघटनांनी सोमवारी 'भारत बंद'चे आवाहन केले होते.

नगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा, आयटक, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, बीडी कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी केंदम सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेती, रोजगार, कामगार आणि आर्थिक अवस्था अशा मुद्यांवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी असल्याचा आरोप किसान संयुक्त मोर्चाचे राज्य सचिव सुभाष लांडे यांनी केला.

केंद्रातील सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशासह देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात दहा महिन्यांपासून आंदोलन करत आहे. देशातील उद्योगपतींनी कामगारांना कामावरून कमी करण्याचा सपाटा लावला आहे. लाखो बेरोजगार झाले आहेत. शेतकरी आंदोलन व वाढत्या बेरोजगारीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात ॲड. सुधीर टोकेकर, अर्शद शेख, भैरवनाथ वाकळे, संजय झिंजे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, राम पानसंबळ, रविंद्र भोसले, बाळासाहेब वडाळगे, सतीश शेळके, रविंद्र कर्डिले आदी सहभागी झाले.

शेतकरी आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मात्र आम्ही हक्कासाठी लढत राहणार आहोत. दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आमचा पाठींबा आहे.

सुभाष लांडे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com