धरणांतील जलसंचयाला वेग

धरणांतील जलसंचयाला वेग

भंडारदरा 65 तर मुळाने 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला

भंडारदरा/अहमदनगर |वार्ताहर| bhandardara

भंडारदरा पाणलोट पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी संततधार टिकून आहे, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरण 63 टक्के भरले असून आज सायंकाळपर्यंत ते 65 टक्क्यांवर जाणार आहे.

या पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. मुळा धरणातील जलसाठ्याने शुक्रवारी दुपारी 3 वाजता 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षी या काळात मुळा धरणात 81 टक्के जलसाठा होता.

दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. त्यातच गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. घाटघर येथे सकाळी 170 मी.मी. तर रतनवाडी येथे 159 मी.मी., पांजरे 130 मी.मी., भंडारदरा 127 मी.मी पावसाची नोंद झाली.

दरम्यान कळसूबाई शिखराच्या पर्वतरांगात ही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे 70 मी.मी पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघुपाटबंधारे तलावावरुन सकाळी 6 वाजता 1012 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात झेपावले. यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी 6 वाजता 5352 दलघफु इतका झाला.

तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6637 दलघफु म्हणजे 63 टक्के झाला. सुरू असलेल्या भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून पावसाअभावी खोळंबलेल्या भात लागवड (आवणी) पुन्हा जोमात सुरू झाल्याने आदिवासी शेतकरी बांधवांच्या चिंता दुर झाल्या आहेत. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे. दरम्यान काल सायंकाळनंतर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com