कोपरगाव येथे गोदावरीचे पात्र दुथडी असून रात्री वाढवलेल्या विसर्गामुळे लहान पुलाला पाणी लागले होते.
कोपरगाव येथे गोदावरीचे पात्र दुथडी असून रात्री वाढवलेल्या विसर्गामुळे लहान पुलाला पाणी लागले होते.

भंडारदराही निम्मे भरले! गोदावरीला पुर

नदीकाठच्या नागरिकांना अतीदक्षतेचे आदेश, नगर जिल्ह्यात तीन दिवस पावसाचे संकट

पाणलोटात पावसाचे तांडव

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने निळवंडे पाठोपाठ उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदराही आता निम्मे भरले आहे. अतिवृष्टी सुरू असल्याने काही ठिकाणी बांध फुटले. या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा रविवारी मध्यरात्री निम्म्यावर पोहचला होता. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सोमवारी दिवसभरात 164 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. सायंकाळी 4390 दलघफू (52.76टक्के) झाला होता. दिवसभरात 278 दलघफू नवीन पाणी दाखल झाल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 5295 दलघफू(47.96 टक्के) झाला आहे. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला होता. वाकी तलावाचा विसर्ग 1022 क्युसेक असून हे पाणी निळवंडेत जमा होत आहे.

प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. भंडारदरात रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर काल सोमवारी वाढला होता. पडणार्‍या पावसाची नोंद 87 मिमी झाली आहे. त्यामुळे कृष्णवंती नदी आणि ओढे नाले भरभरून वाहत आहेत. रतनवाडी घाटघर, साम्रद ही धुक्यात हरवलेली गावे असल्याचे दिसून आले. धो धो पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन पुरते गारठून गेले आहे. जनावरेही गारठून जात आहेत.

पावसाने जोर पकडल्याने डोंगर दर्‍यांमधून वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढेनानाल्यांना पूर आला असून धरणात विसावर आहे. त्यामुळे धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे.

टिटवी तुडूंब

अकोले तालुक्यातील 303 दलघफू क्षमतेचा टिटवी तलावही काल सायंकाळी 6 वाजता तुडूंब झाला असून ओव्हरफ्लो सुरू आहे. याचा लाभ निळवंडेतील पाणीसाठा वाढण्यावर होणार आहे. या तालुक्यातील पिंपळगाव खांड, वाकी, आंबित, शिरपुंजे, पाडोशी, सांगवी, कोथळे तलाव यापूर्वीच भरलेले आहेत.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

भंडारदरा - 95, घाटघर - 124, पांजरे - 00, रतनवाडी - 109, वाकी - 85, गंगापूर - 113, त्र्यंबक - 93, अंबोली - 166, गौतमी - 105, दारणा - 58

69562 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गेल्या 4-5 दिवसांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धुव्वाधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, कडवा, पालखेड ही धरणं 60 टक्यांपर्यंत पोहचल्याने या धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. दारणातून 15572 क्युसेक, गंगापूर 10035 क्युसेक, पालखेड 22354 क्युसेक तर कडवातुन 6712 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.

हे विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत काल 63966 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर रात्री 9 वा. हा विसर्ग 69562 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दरम्यान रात्रीतून गोदावरीतील विसर्ग वाढून 70 हजार क्युसेक होऊ शकतो.

दोन दिवसांपासून पावसाने घाटमाथ्यावर जोरदार बॅटिंग केली. यामुळे मोठ्या प्रमाणात धरणात आवक सुरू झाली. दारणा 60 टक्के झाल्यानंतर परवा त्यातून 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येऊ लागला. परंतु दोन दिवसातील पावसाने या धरणाची पाण्याची पातळी वेगाने वाढली त्यामुळे विसर्ग वाढविण्यात आले. दारणा 67 टक्क्यांवर पोहचले. त्यामुळे काल सकाळी 7 वाजता दारणातून 9200 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तो तासाभरात 8 वाजता 11402 क्युसेक, 9 वाजता 11402 क्युसेक, 10 वाजता 13334 क्युसेक, दुपारी 1 वाजता 15088 क्युसेक करण्यात आला.

सायंकाळी 6 वाजता 15772 क्युसेक इतका करण्यात आला. दारणाच्या सहाही वक्राकार गेट मधून विसर्ग करण्यात येत आहे. विद्युत प्रकल्पाच्या गेट मधुन 1100 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे. दारणाच्या पाणलोटातील इगतपूरीला 132 मिमी, भिंतीजवळ 64 मिमी घोटीला 142 मिमी पावसाची नोंद झाली. कालही दुपारी चार पर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. पाऊस अजुन शिल्ल्क असल्याने विसर्ग करण्यात येत आहे. दारणात 854 दलघफु पाणी 24 तासात दाखल झाले. भावली धरण 65 टक्क्यांवर पोहचले आहे. मुकणे 50.56 टक्के, भाम 46.06 टक्के, वालदेवी 15.09 टक्के भरले आहे.

गंंगापूर धरणाच्या पाणलोटातही जोरदार पाऊस झाला. काल दिवसभरातील सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूरला 113 मिमी, त्र्यंबकला 93 मिमी, अंबोलीला 166 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या कालावधीत गंगापूर मध्ये 825 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरला 73 मिमी, अंबोलीला 166 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अर्धा टीएमसीहुन अधिक पाणी नव्याने या धरणात दाखल झाले. गंगापूर काल सांयंकाळी 6 वाजता 67 टक्के इतके भरले होते. गौतमी धरणाच्या भिंतीजवळ काल दिवसभरात 105 मिमी पावसाची नोंद झाली.

काल सकाळी मागील 24 तासात 108 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गौतमी 40.69 टक्क्यांवर पोहचले. कश्यपीला काल सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत 75 मिमी पावसाची नोंद झाली. तर काल सकाळी मागील 24 तासांत 88 मिमी पावसाची नोंद झाली. हे धरण 30.62 टक्के पाणी साठा झाला होता. गंगापूर धरणात पाण्याची आवक पाहता या धरणातुन काल सकाळी 11 वाजता 1600 क्युसेक ने विसर्ग करण्यात येवु लागला. तो टप्प्या टप्प्याने वाढवत काल दुपारी 2 वाजता 10035 क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला नाशिक शहरात पुराचे स्वरुप प्राप्त झाले होते.

पालखेड धरण 50 टक्क्यांच्या पुढे सरकल्याने त्यातुन टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढवत तो 22354 क्युसेक इतका करण्यात आला. हे पाणी कादवा नदीत सोडले जावुन ते गोदावरीला नांदूरमधमेश्वर मध्ये मिळत आहे. कडवा 68.90 च्या पुढे सरकल्याने काल दिवसभर या धरणातुन 6712 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

गोदावरीत दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा, नाशिक शहर व परिसरातील पाणी दाखल होत होते त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन गोदावरीत जायकवाडच्या दिशेने काल सायंकाळी 6 वाजता 55790 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. या बंधार्‍याचे सर्व आठही गेट पूर्णपणे उचलण्यात आले आहेत. त्यापुर्वी काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून 9465 क्युसेक, 8 वाजता 12620 क्युसेक, 12 वाजता 27868 क्युसेक, 2 वाजता 41613 क्युसेक, 3 वाजता 49480 क्युसेक, 5 वाजता 55790 क्युसेक इतका करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता 63966 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पाण्याची आवक पाहता हा विसर्ग 70 हजार क्युसेक पर्यंत रात्रीतुन वाढु शकतो. काल सकाळी सहा वाजेपर्यंत 1 जूनपासुन या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सव्वा टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

जायकवाडीचा साठा वाढणार

काल सोमवारी सायंकाळी 6 वाजता जायकवाडीतील उपयुक्त साठा 35.70 टक्के होता. मृतसह एकूण साठा 53.65 टक्के इतका आहे. धरणात 8574 क्युसेकने आवक सुरू आहे. पण गोदावरी नदीला पूर आल्याने हे पाणी दाखल झाल्यानंतर या धरणाचा साठा वाढणार आहे.

गेल्या पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात म्हणजे जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातील तीन ते चार दिवसात दारणा, गंगापूर धरणात अपेक्षित पाणीसाठा होऊन नदीपात्रात पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. घाटमाथा आणि मध्यप्रदेशकडुन येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे येत्या तीन ते चार दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल अशी स्थिति आहे. नांदुर मधमेश्वर बंधार्‍यावरुन पुढील कालखंडात भरपुर पाणी नदीपात्रात सोडले जाईल जेणेकरुन जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा 65 टक्के होऊन समन्यायीच्या जोखडातुन यावर्षीही सुटका मिळेल, असे चित्र आहे. जायकवाडीत आज दि. 11 रोजी 27 टीएमसी (35.21 टक्के ) जिवंत पाणीसाठा असून 65 टक्यासाठी, त्यांनी खरीपात वापरलेल्या पाण्यासह, 50 टिएमसी पाण्याची आवश्कता असते.

- श्री उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग.

कुकडीतील पाणीसाठा 16 टक्क्यांवर

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने उपयुक्त पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासांत रविवारच्या तुलनेत अधिक आवक झाली. रविवारी 1740 दलघफू तर सोमवारी 1827 पाणी नव्याने दाखल झाले आहे.

पडणारा पाऊस आणि होणारी आवक यामुळे या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 4781 दलघफू (16.11टक्के) झाला होता. गतवर्षी याच काळात 5268 दलघफू पाणीसाठा होता. पिंपळगावजोगे धरणात तब्बल 722 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तर डिंभेत 282 दलघफू नवीन पाणी आले. कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 30 टीएमसी आहे. या प्रकल्पाव्दारे जुन्नर,आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यातील शेती सिंचनासाठी होतो. रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी या धरणांमध्ये अल्पसा साठा होता. तो आता 13 टक्क्यांवर पोहचला आहे.

येडगाव धरणात 158, माणिकडोह 399, वडज 65, पिंपळगावजोगे 814, डिंभे 304 दलघफू नवीन पाणी आणले. घोड धरणाच्या पावणलोटातही पाऊस होत असल्याने या धरणातही आता आवक होऊ लागली आहे.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

येडगाव - 48, माणिकडोह - 116, वडज - 49, पिंपळगावजोगे - 97, डिंभे- 42

हरिश्चंद्र गड, पाचनई तसेच अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदी दुथडी वाहत आहे. या नदीतील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हरिश्चंद्र गड, पाचनई तसेच अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदी दुथडी वाहत आहे. या नदीतील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुळा धरण 40 टक्के भरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक साठवणक्षमता असलेल्या मुळा धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 10738 दलघफू (39.30 टक्के) झाला. रात्री उशारा या साठ्यात भर पडल्याने तो 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

मुळा नदीचा विसर्गही सातत्याने वाढू लागला आहे. या नदीतील विसर्ग काल सकाळी 7662 क्युसेक होता. तो सायंकाळी 6 वाजता 10738 क्युसेकपर्यंत पोहचला. रात्री 9 वा. तो 13836 क्युसेकने सुरू होता. पावसाचा जोर लक्षात घेता रात्री हा विसर्ग 15, 16 हजार क्युसेकपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला आहे. काही ठिकाणी नुकसानीचेही वृत्त आहे.

दरड कोसळली, रस्ता बंद

मुळा पाणलोटात संततधार सुरू असल्याने दरडी कोसळल्याचे प्रकार घडू लागले आहेत. काल सोमवारी कोतूळ गोडेवाडी रस्त्यावर असलेल्या वांजरनळी घाटात दरड कोसळल्याने या रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे. एक महाकाय दगड रस्त्यावरच पडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिनेश बिंदू व उपअभियंता बंड यांनी धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गांभीर्याने दखल घेत याठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे फलक लावले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com