भंडारदरातील पाणीसाठा 3000 दलघफू

भंडारदरातील पाणीसाठा 3000 दलघफू

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात चार दिवसांपासून पाऊस सुरू असून धरणात नव्याने पाण्याची आवक वाढू लागली आहे. काल सोमवारी दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद भंडारदरात 9 मिमी झाली आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 77 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 2962 दलघफू पाणीसाठा झाला होता. रात्री उशीरा तो 3000 दलघफूवर पोहचला होता.

पाणलोटात आठ दिवसांपासून पाऊस टिकून आहे. कळसूबाई शिखर, कोकणकडा तसेच भंडारदरा धरण परिसर धुक्याने लेपाटून गेला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून या परिसरातील सौंदर्य खुलू लागले आहे. या हंगामात धरणात नव्याने 657 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा-भंडारदरात 15, घाटघर38 पांजरे 25, रतनवाडी 30 तर वाकी 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी धरणातही धिम्या गतीने पाण्याची वाढ होत आहे या धरणातील पाणीसाठा 53 टक्क्यांनजीक आला आहे.

पाऊस होत असल्याने या भागातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शेती कामांनी वेग घेतला आहे. भाताची पेरणी केली तेथे रोपे चांगली उतरू गलागली आहेत. कोकण आणि मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास भंडारदरा, मुळा पाणलोटातही पुन्हा मान्सून जोरदार बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुकडी प्रकल्पात 65 दलघफू पाणी दाखल

कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरल्याने नव्याने पाण्याची आवकही मंदावली आहे. समूह धरणांत गत 24 तासांत केवळ 64.76 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. या धरणांतील एकूण पाणीसाठा 1704 दलघफू झाला होता. कालव्याला पाणी सुरू असल्याने आवक या आवर्तनात खर्च होत आहे. त्यामुळे साठा कमी होत आहे. त्यात पाणीसाठा केवळ 5.74 टक्के आहे. यंदा खूपच कमी पाणीसाठा आहे. कारण गतवर्षी याच काळात या समुहात 5191 दलघफू पाणी होते. या पाणलोटात पावसाचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास धरणांमध्ये आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे.

पिंपळगाव खांड धरण आज ओव्हरफ्लो होणार

कोतूळ |वार्ताहर| Kotul

हरिश्चंद्र गड, पाचनई व अन्य भागात पावसाचा जोर वाढल्याने अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणात नवीन पाण्याची जोरदार आवक सुरू असून 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 500 दशलक्ष घनफुटाच्या पुढे गेला आहे. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास हे धरण आज ओव्हरफ्लो होईल. या धरणातील पाणीसाठा फुगत असल्याने कोतूळ-अकोले मार्ग बंद झाला असून अन्य मार्गाचा अवलंब वाहनधारकांना करावा लागत आहे. हे धरण भरल्यानंतर मुळा नदीतील पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावेल. सध्या 3000 क्युसेकने मुळा नदी वाहती आहे.पहिल्यांदाच या भागात या नदीला एवढा विसर्ग राहिला आहे. (पान 6 वर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com