
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य अवलंबून असलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे 60 टक्क्यांवर पोहचला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल रविवारी सायंकाळी पाणीसाठा 6637 दलघफू (60.12 टक्के) झाला होता. कालही पावसाचा जोर टिकून असल्याने पाण्यात वाढ होत आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात बुधवारी पुन्हा पावसास सुरूवात झाली. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पाऊस वाढला. पण शुक्रवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शनिवारी पावसाचा काहीसा जोर कमी झाला होता. पण रविवारी पुन्हा पाऊस वाढल्याने धरणात पाणी येत आहे. काल सकाळी धरणातील पाणीसाठा 6530 दलघफू (59.15 टक्के) होता. तो सायंकाळी 6637 दलघफू (60.12 टक्के) झाला होता.
काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 260 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी 70 टक्के पाण्याचा वापर झाला. तर 180 साठ्यात वाढ झाली. 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा परिसरात पावसाचा जोर असल्याने कृष्णवंती नदीवरील 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातून 1022 क्युसेकन ओव्हरफ्लो कायम आहे. त्यामुळे खाली कृष्णवंती नदी वाहती झाल्याने व इतर ओढेनाल्यांचे पाणी येत असल्याने निळवंडे धरणातीलही साठा वाढू लागला असून हे धरण 25 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. रविवारी सकाळपर्यंत नव्याने 99 दलघफू पाणी आल्याने या धरणातील पाणीसाठा 1972 दलघफू (23.70 टक्के) झाला होता.
गत 24 तासांत झालेला पाऊस (मिमी)- भंडारदरा 67, घाटघर 70, पांजरे 65, रतनवाडी 735, वाकी 52. दरम्यान, शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली होती. पर्यटकांनी डोंगरदर्यांवरील धबधबे, फुललेले सौंदर्याचा आस्वाद घेतला.
कोतूळ |वार्ताहर| Kotul
नगर जिल्ह्याला जिवनदायिनी ठरलेल्या मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सकाळपर्यंत या धरणात 203 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सकाळी 9679 दलघफू पाणीसाठा झाला होता. तर 3319 क्युसेकने आवक सुरू आहे. आवक वाढल्यास एक-दोन दिवसांत धरणातील पाणीसाठा 10000 दलघफूवर जाण्याची शक्यता आहे.
तीनचार दिवसांपूर्वी पाणलोटातून पाऊस गायब झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण या भागातील नूर शुक्रवारपासून बदलला. रिपरिप सुरू असल्याने मुळा नदी 1000 क्युसेकने वाहत होती. पण शुक्रवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 3822 क्युसेक होता. शनिवारी पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. रविवारी पाऊस वाढल्याने मुळा नदीतील पाणी वाढू लागले आहे.
यापूर्वी आंबित बंधार ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर तीन चार दिवसांत 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड हे धरण भरले. त्यानंतर पाणी राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावत असून धरणातील पाणीसाठा वाढत आहे.