भंडारदरा 65 टक्के

निळवंडेतील साठा 70 टक्के होणार || येडगाव तुडूंब, डिंभे 40 टक्के
भंडारदरा (File Photo)
भंडारदरा (File Photo)

पाणलोट पाऊस (मिमीमध्ये) -

भंडारदरा - 252, घाटघर - 268, पांजरे - 00, रतनवाडी - 262, वाकी - 241

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आाणि निळवंडे धरणाच्या पाणलोटात आषाढसरींचे तांडव नृत्य सुरू असल्याने डोंगरदर्‍यातील धबधब्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले असून छोट्या नद्या, ओढेनालेही सैराट झाल्याने दोन्हीही धरणांमध्ये जोरदार नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 6946 दलघफू (62.93टक्के) झाला होता. आज हा साठा 65 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.

जोरदार पाऊस होत असल्याने अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. त्यात काही ठिकाणी भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातरोपे पाण्यात असल्याने ती सडण्याची भीती व्यक्त होत आहे.

भंडारदरात गत 24 तासांत तब्बल 784 दलघफू पाणी आले. त्यामुळे काल गुरूवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 6549 दलघफू (59.32 टक्के) झाला होता. निळवंडेत 284 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा काल सकाळी 5188 दलघफू (62.35टक्के) झाला होता. सायंकाळी हा साठा 5419 दलघफू (65.05 टक्के) झाला. आज या धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचण्याची दाट शक्यता आहे.

कालही पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने आवक सुरू असल्याने तासागणिक पाणीसाठा वाढत आहे आठवडाभरात भंडारदरात तब्बल 4470 दलघफू पाणी नव्याने आले आहे. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 65 मिमी झाली आहे.

आढळा तुडूंब, कोणत्याही क्षणी विसर्ग सोडणार

आषाढ सरी जोरदार बरसत असल्याने पाण्याची जोरदार आवक होत आहे. परिणामी 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात काल सायंकाळी 1005 दलघफू पाणीसाठा झाला होता. आवक अद्यापही सुरू असल्याने हे धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफलो होण्याची शक्यता आहे.

येडगाव तुडूंब, डिंभे 40 टक्के

गत चार दिवसांपासून कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव व अन्य ठिकाणी धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 2110 दलघफू क्षमतेचे येडगाव धरणातील पाणीसाठा 85 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तर 13500 दलघफू साठवण क्षमता असलेले डिंभे धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहचला आहे.

गत 24 तासांत 952 दलघफू पाणी नव्याने जमा झाले आहे. त्यामुळे एकूण उपयुक्त पाणीसाठा 12545 (42. 27 टक्के) दलघफू झाला आहे.

आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव जोगे या धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये होता. त्यात लक्षणीय वाढ होत या धरणातील पाणीसाठा 1200 दलघफूच्या पुढे गेला आहे माणिकडोह धरणही 42 टक्के झाले आहे. या धरणातील पाणीसाठा 4022 दलघफू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमालीची वाढ झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे..

काल सकाळपर्यंत येडगावात 308, माणिकडोह 450, वडज 211, पिंपळगावजोगे धरणात245 दलघफू तर डिंभेत 566 दलघफू नवीन पाणी आले. दीड टिएमसीचे चिल्हेवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून मांडवी नदीत विसर्ग सुरू आहे.

घोडमध्ये 40 टक्के पाणी

घोड धरणातही आता पाण्याची नवीन आवक सुरू झाली आहे. सध्या या धरणात 2223 दलघफू पाणीसाठा आहे. कोरडी पडलेली घोडनदीही आता खळखळू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com