भंडारदरा ओव्हरफ्लोच्या मार्गावर

निळवंडे 77 टक्के पाणी, पिकांची मोठ्या प्रमाणात हानी
भंडारदरा ओव्हरफ्लोच्या मार्गावर

विसर्ग (क्युसेक) : भंडारदरा - 854, निळवंडे- 800, आढळा - 613, म्हाळुंगी - 540

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. काल सोमवारी सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 82 टक्क्यांवर पोहचला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 9039 दलघफू झाला होता. त्यामुळे पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास तसेच वाढल्यास हे धरण दोन तीन दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

15 ऑगस्टला पूर्ण क्षमतेने हे धरण भरले जाते. पण सध्या जुलै महिन्यातच या धरणातील पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यात कालपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यास साठा नियंत्रित करण्यासाठी वाढीव पाणी नदीत सोडण्यात येते. तशीच वेळ दोन तीन दिवसांत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निळवंडे धरणही येत्या काही दिवसांत ओव्हरफ्लो होणार आहे.

गत 24 तासांत 203 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यात 35 दलघफू पाणी वापर झाला. 168 दलघफू साठ्यात वाढ झाली. काल दिवसभरात 61 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी ओव्हरफ्लो 556 क्युसेक आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा 6402 (76.87) दलघफू पाणीसाठा झाला होता. या धरणातून प्रवरा नदीत 800 क्यसेकने पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, आषाढ सरींच्या तांडवामुळे पाणलोटात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भात पिकासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत व त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

कुकडी 55 टक्के

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे,डिंभे धरणात गत वर्षी याच काळात केवळ 5600 दलघफू (18.87टक्के) पाणीसाठा होता. पण यंदा 16291 दलघफू (55 टक्के) पाणीसाठा आहे.

पाणलोटात पावसाचा जोर कमी आहे. पण अधूनमधून कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍यांतून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 699 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

येडगाव धरणात 91.49, माणिकडोह 46.75, वडज 75.78, पिंपळगाव जोगे 45.36, डिंभे 56.82 टक्के भरले आहे. आठ दिवसांत या प्रकल्पात सुमारे 15750 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान पाणलोटात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

घोड धरणात 73 टक्के पाणीसाठा

कुकडी धरण साखळीतील वडज धरणाचा विसर्ग व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात काल अखेर 73 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील आठवड्यापासून कुकडी प्रकल्पातील धरणक्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वडज धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाला असल्यामुळे त्यामधील पाणी त्याचबरोबर भीमाशंकर खोर्‍यात पडत असलेल्या पावसाचे पाणी घोड धरणात येत आहे. त्यामुळे जलाशयात काल अखेर 4658 दलघफू पाणीसाठा जमा झाला आहे. घोड धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा-शिरूर तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com