भंडारदरात पुन्हा पाऊस सुरू

भंडारदरात पुन्हा पाऊस सुरू

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरात गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पाणलोटात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपात सरी कोसळू लागल्या आहेत. पाऊस पुन्हा पडता झाल्याने पाणलोटातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल शनिवारी सायंकाळी 10735 दलघफू (97.35 टक्के) झाला आहे.

निळवंडेत काल सायंकाळी 6943 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून प्रवरा नदीपात्रात 1600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस कमी झाल्याने चार पाच दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. पण कालपासून पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. घाटघर आणि रतनवाडीत प्रत्येकी दोन इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे भंडारदरात 67 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरात काल दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसाची नोंद 13 मिमी झाली आहे. पावसाळी वातावरण टिकून असून मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.

मुळा पाणलोटातून पावसाने काढता पाय घेतला होता. पण काल या पाणलोटातही अधूनमधून पाऊस कोसळत होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 795 क्युसेक आहे. काल सायंकाळी नदीतील पाणी काहीसे वाढले होते. या धरणातील पाणीसाठा सकाळी 20695 दलघफू झाला होता. पिण्याच्या पाण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या काही शेतकरी तुषार पध्दतीने पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com