भंडारदरातील पाऊस मंदावला

निळवंडे 75 टक्के, आढळा 70 टक्के भरण्याच्या मार्गावर
भंडारदरातील पाऊस मंदावला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत पावसाचा जोर ओसरल्याने भंडारदरातून सोडण्यात येणार विसर्ग 835 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला आहे. असे असलेतरी 479 दलघफू पाणी नवीन आल्याने 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतील पाणीसाठा 6252 दक्षलक्ष घनफुटावर (75टक्के) पोहचला आहे.

तसेच आढळा पाणलोटात पाऊस होत असल्याने या धरणातील पाणीसाठा गत तीन दिवसांपासून वाढत आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 721 दलघफू (68 टक्के) झाला आहे. आज सकाळपर्यंत या धरणातील पाणी 70 टक्के झालेले असेल.

पाच-सहा दिवसांपासून पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याच्यादृष्टीने 83 टक्के कायम ठेऊन जादा होणारे पाणी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठा वाढत गेला. पण शनिवारपासून पाणलोटातील पाऊस कमी झाल्याने आवकही मंदावली आणि काल पहिल्यांदाच या धरणातून वीज निर्मितीसाठी 835 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद केवळ 9 मिमी झाली.

गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा - भंडारदरा 67, घाटघर 93, पांजरे 79, रतनवाडी 99, वाकी 45 मिमी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com