भंडारदरा 85, मुळा 65 टक्के भरले !
सार्वमत

भंडारदरा 85, मुळा 65 टक्के भरले !

निळवंडेसह तीनही धरणांत विक्रमी नवीन पाण्याची आवक

Arvind Arkhade

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढत आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात तब्बल 737, निळवंडे 303 आणि मुळा धरणात 1006 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 6 वाजता 9182 दलघफू पाणीसाठा झाला होता. रात्री उशीरा हे धरण 85 टक्के भरले होते. निळवंडेत 5500 दलघफू पाणीसाठा असून हेही धरण 70 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.

तर मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक होत असल्याने काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 16439 दलघफू झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 20000 दलघफूच्या पुढे पाणीसाठा झाण्याची शक्यता आहे. गत तीन दिवसांपासून होणार्‍या जोरदार पावसामुळे ही तीनही धरणं भरण्याची शक्यता वाढली आहे.

पाणलोटात पावसाचा जोर सुरू असल्याने मुळा नदीवरील 202 दलघफू क्षमतेचे बलठण तलाव ओसंडून वाहत आहे. पाडोशी आणि सांगवी ही छोटी धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत. दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या भोजापूर धरणातही 80 टक्के पाणीसाठाझाला आहे. पावसामुळे भंडारदरा आणि मुळा पाणलोटात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. हिरव्यागार शालूने परिसर नटून गेला आहे.

कुकडी, डिंभे धरण 60 टक्के

पाणलोटात पाऊस सुरू असल्याने दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकुडी धरण समुहातील धरणांमध्येही पावसामुळे आवक सुरूच आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल सकाळी 7210 दलघफू (60 टक्के) नोंदवला गेला. सुमारे बाराशे दलघफू क्षमतेचे वडज धरणातील पाणीसाठा 822 दलघफू (66 टक्के)पाणीसाठा होता. या दोन्ही धरणांच्या तुलनेत माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणात मंदगतीने आवक होत आहे. येडगाव धरणात 822 दलघफू (66 टक्के) साठा झाला आहे. कुकडी प्रकल्प जुन्नर, शिरूर, पारनेर, नगर, श्रीगोंदा आदी तालुक्यांना वरदान ठरलेला आहे. त्यामुळे याभागातील शेतीचे नियोजन याच धरणातील पाणीसाठ्यावर केले जाते. घोड धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 3467 दलघफू (58 टक्के) झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com