भंडारदरात जोरदार पाण्याची आवक

भंडारदरात जोरदार पाण्याची आवक

मुळा धरणात 9925 दलघफू पाणीसाठा, आवक सुरूच || कुकडीचाही साठा वाढला

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला (Ahmednagar District) वरदान ठरलेल्या भंडारदरा (Bhandardara), मुळा पाणलोटात (Mula Watershed)रविवारी दुपारपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने दोन्हीही धरणांत नव्याने जोरदार पाण्याची आवक होत आहे. भंडारदरात (Bhandardara) गत 36 तासांत तब्बल 489 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. तर मुळा नदीही (Mula River) दुथडी वाहत आहे. छोट्या धरणांमधील पाणीसाठाही वाढत आहे. तसेच नाशिक आणि पुण्यातील कुकडी धरणाच्या (Kukadi Dam) पाणीसाठ्यात (Water Storage) वाढ होत आहे.

पाणलोटात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. पण भंडारदरा (Bhandardara) आणि मुळा धरण (Mula Dam) पाणलोटात शनिवारी रात्रीपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला. घाटघरला 73 मिमी पाऊस पडला. त्यानंतर रविवारीही पावसाळी वातावरण टिकून होते. दुपारनंतर भंडारदरासह (Bhandardara), घाटघर (Ghatghar), पांजरे (Panjare) आणि रतनवाडीत (RatanwadI) पावसाने जोर धरला. घाटघरमध्येतर धो-धो पाऊस सुरू होता त्यामुळे नेकलेस, नामी, मनोहर, पांजरेसह अन्य लहान मोठे धबधबे आता आक्राळविक्राळ रूप घेत असून ओढेनाले भरभरून वाहत असून धरणाच्या पाणीसाठ्यात सामावत आहेत. परिणामी धरणातील पाण्याचे पोट हळूहळू फुगू लागले आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात रविवारी सकाळी 4648 दलघफू साठा होता. तो सोमवारी सायंकाळी तो 5008 दलघफू झाला होता. पावसाचे प्रमाण टिकून राहिलेतर आज उद्या हे धरण निम्मे होण्याची शक्यता आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतही नवीन पाणी येत असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 1426 दलघफू होता. 102 दलघफू क्षमतेचे वाकी तलावातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर पोहचला आहे.निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात हळूवारपणे नवीन पाण्याची आवक होत आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही कोतूळ, हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत जोरदार पाऊस झाल्याने काल सकाळी मुळा नदीतील पाणीपातळी 5990 क्युसेक होती. त्यानंतर पाणलोटात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सायंकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 5075 क्युसेक होता. भातखाचरांमध्ेये पाणी साचल्याने आता भात लागवडीच्या कामाला शेतकरी जुंपला आहे.

26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सकाळी 9897 तर सायंकाळी 9925 दलघफू पाणीसाठा होता. पावसाचा जोर टिकल्यास आज हा पाणीसाठा 10000 क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कुकडीचाही साठा वाढला

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाचही धरणांत आता नव्याने पाण्याची आवक होऊ लागल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठे असलेले डिंभे धरणातील पाणीसाठा 3240 दलघफू (26 टक्के) झाला आहे. येडगाव धरणात 890 दलघफू, माणिकडोहध्ये 1270 दलघफू, वडजमध्ये 440 दलघफू पाणीसाठा आहे. घोड धरणातील पाणीसाठा 1548 दलघफू झाला आहे.

भंडारदरा क्षमता - 11039 (दलघफू), सध्याचा साठा 5008 (दलघफू)

मुळा धरण क्षमता - 26000 (दलघफू), सध्याचा साठा 9925 (दलघफू)

मुळा विसर्ग - 5075 क्युसेक

पाऊस मिमी

भंडारदरा 122

घाटघर 195

पांजरे 128

रतनवाडी 126

वाकी 70

भावली 246

इगतपुरी 222

अंबोली 156

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com