भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यासाठी (Ahmednagar District) वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा (Bhandardara Dam water Storage) आता थेट 83 टक्के झाला आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरला (rain subsided) असला तरीही परिसरातील सह्यकड्यावरुन घरंगळणारे पाण्याचे ओहोळ अजूनही आवेशात वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा टिकून आहे.

घाटघर (Ghatghar) परिसरात दाट धुके आणि त्यात हरवलेला कोकणकडा (Kokankada) पाहण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने घाटघरच्या दिशेने जात असून शनिवार व रविवार वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई असल्याने अनेकांचा काल हिरमोड झाला.

वेळापत्रकानुसार भंडारदरा धरणाची (Bhandardara Dam) पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहासह धरणाच्या मोरीतून एकूण 1 हजार 257 क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने अप्पर मोरीद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पर्यटकांना प्रेमात पाडणारा छत्री धबधबा (अंम्ब्रेला फॉल) सुरु झाला असून भंडारदराच्या उद्यानात पर्यटकांची मांदीयाळी अनुभवण्यास मिळत आहे.

निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरील (peaks of Kalsubai) पाऊसही थांबला आहे. अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरी वगळता पावसाने विश्रांती घेतल्याने वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन कोसळणारा प्रवाह कमालीचा मंदावला आहे. सध्या या जलाशयाच्या भिंतीवरुन 789 क्युसेक्सचा प्रवाह निळवंडेच्या जलसाठ्यात विसावत असून त्यात भंडारदर्‍यातून सोडलेले पाणीही मिसळत असल्याने निळवंड्याचा पाणीसाठा (Nilwande Water Storage) हलता आहे. गेल्या चोवीस तासात निळवंडे धरणात भंडारदर्‍यापेक्षा अधिक पाणी जमा झाले आहे हे विशेष.

गेल्या चोवीस तासांत भंडारदरा येथे 57 मि.मि., घाटघर येथे 40 मि.मि., रतनवाडी येथे 29 मि.मि., पांजरे येथे 27 मि.मि., वाकी येथे 30 मि.मि. व निळवंडे येथे अवघ्या 05 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भंडारदरात 228 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून धरणसाठा 9 हजार 148 दशलक्ष घनफूट (82.87 टक्के), निळवंडेत 244 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून जलसाठा 3 हजार 790 दशलक्ष घनफूट (45.51), आढळा धरणात अवघे दोन दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून जलसाठा 509 दशलक्ष घनफूट (47.83 टक्के), भोजापूर धरणात मात्र अद्याप नवीन पाण्याची प्रतीक्षा असून पाणीसाठा उणे आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात (Mula Dam) गेल्या 24 तासांत 625 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून एकूण धरणसाठा 15 हजार 251 दशलक्ष घनफूट (58.68 टक्के) झाला आहे. सध्या धरणात 4 हजार 643 क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून पावसाचा जोर ओसरल्याने त्यात घट झाली आहे. मागील बारा दिवसांपासून सातत्याने हरिश्चंद्रगडावर कोसळणार्‍या जलधारांनी आता विश्रांती घेतली असून अधुनमधून आषाढसरींचा फेर सुरु आहे.

अकोले (Akole) तालुक्याचा पश्चिम घाटमाथा पावसाने चिंब भिजत असला तरीही उत्तरेकडील आढळा धरण समूहासह भोजापूरच्या पाणलोटाला मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून जलसाठ्यातील किरकोळ वाढ वगळता या धरणांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे ‘पश्चिमेकडे हसू तर उत्तरेकडे आसू’ अशी विरोधाभासी स्थिती सध्या तालुक्यात दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com