घाटघरला 6 इंच पाऊस

वाकी तलावात निम्मा पाणीसाठा होणार
घाटघरला 6 इंच पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघरला 157 मिमी पावसाची नोंद झाली. रतनवाडीतही जोरदार पाऊस कोसळत आहे.

भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत गत पाच दिवसांपासून मान्सून सक्रिय आहे. कमी अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या. पण काल कोकणकडा, कळसूबाई शिखर, घाटघर, रतनवाडी आणि पांजरेत जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धबधबे आता आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. घाटघर आणि रतनवाडीत अधूनमधून धो धो पाऊस कोसळत असल्याने या भागातील ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. पाणलोट धुक्यांनी लपेटून गेला असून भात खाचरांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. संततधार सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

11039 दल घफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 5290 दलघफू होता. निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. वाकी तलावातील पाणीसाठा वाढु लागला असून हा तलावातील पाणीसाठा निम्मा होणार आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 50 दलघफू पाणीसाठा होता. पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणलोटात शेती कामांनी वेग घेतला आहे.

काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 79, घाटघर 157, रतनवाडी 135, वाकी 57.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com