Video : भंडारदरा ओव्हरफ्लो, निळवंडे भरण्याच्या मार्गावर

Video : भंडारदरा ओव्हरफ्लो,  निळवंडे भरण्याच्या मार्गावर

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी 11 वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भंडारदरा आणि वाकी तलावाचा विसर्ग तसेच अन्य ओढ्यानाल्यांचे पाणी निळवंडे धरणात जमा होत असल्याने सध्या 86 टक्के साठा असून दोन दिवसांत हेही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात मागील तीन दिवसांपासून जोरदार पावसाचे तांडव सुरू आहे.त्यामुळे भंडारदरा धरण रविवारी सकाळी 11 वाजता काठोकाठ भरले. धरणाचा पाणीसाठा 11039 दलघफू (100टक्के) झाल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्याद्वारे 2436 क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे 820 क्युसेक्स असा एकुण - 3256 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला होता. त्यानंतर पाऊस सुरू असल्याने विसर्ग 4400 क्युसेक करण्यात आला. रंधा फॉलही रौद्र रूप धारण करू लागला आहे.

स्पीलवे मधून पाणी सोडन्याच्या वेळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी शेंडी ग्रामपंचायत व अकोले तालुका पत्रकार संघ यांचे वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे,पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयराव पोखरकर,जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे,सरपंच दिलीपराव भांगरे यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करण्यात आले. त्यांनी प्रवरा माईला साडी,चोळी,श्रीफळ, पुष्प अर्पण करण्यात आले.जलपुजनचे पौराहीत्य बाळासाहेब लोहगावकर यांनी केले. यावेळी धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख,अकोले तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शांताराम काळे,सचिव अलताफ शेख, विश्वस्त एस. टी. येलमामे, प्रा.डी.के.वैद्य, भाऊसाहेब मंडलिक, शांताराम गजे, अमोल वैद्य, चंद्रशेखर हासे, संजय शिंदे,नरेंद्र देशमुख, कायदेविषयक सल्लागार अनिल आरोटे, बाळासाहेब घोडके उपस्थित होते.

यावेळी धरणाच्या पाणी सोडण्याचे यंत्रणेची माहिती शाखा अभियंता अभियंता देशमुख यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, भंडारदराचा ओव्हरफ्लो 4400 क्युसेक, वाकीचा 789 क्युसेक तसेच अन्य ओढे-नाल्यांचे पाणी असे मोठ्या प्रमाणात पाणी निळवंडेत जमा होत आहे. काल सायंकाळी 7130 दलघफू पाणीसाठा झाला होता. तासागणिक धरणातील साठा फुगू लागला आहे. पावसाचा जोर असाच टिकल्यास निळवंडेही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्या मुळे यानंतर अधिक विसर्ग वाढविला जाणार नसल्याची माहिती शाखा अभियंता देशमुख यांनी दिली.

कार्यकारी अभियंता नान्नोर, सहाय्यक अभियंता अकोले जोरवकर, 3) शाखा अधिकारी भंडारदरा अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक तेजेश शिंदे, बिनतारी यंत्र चालक प्रकाश चव्हाण, जनरेटर ऑपरेटर पाबळकर, मुकादम वसंत भालेराव, वायरमन अर्जुन धनगर, सुरेश हंबीर, गोविंद बरतड, पांडुरंग झडे, गणपत गोर, मगळीराम मध, दोमोधर धादवड, बाळु भांगरे, चदर उघडे आदी पाणी पातळीवर लक्ष ठेऊन आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com