भंडारदरा धरणाचे आ. डॉ. लहामटे व गायकर यांच्याहस्ते जलपूजन

महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांसह भांगरे गटाची अनुपस्थिती
भंडारदरा धरणाचे आ. डॉ. लहामटे व गायकर यांच्याहस्ते जलपूजन

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा असणार्‍या भंडारदरा धरणाचे शासकीय जलपूजन मंगळवारी आ. डॉ. किरण लहामटे यांच्याहस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी आ. डॉ. लहामटे यांच्याहस्ते प्रवरामाईला साडी, चोळी, श्रीफळ अर्पण करण्यात आले मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह भांगरे गटाच्या ठळक अनुपस्थितीमुळे तालुक्यात महाविकास आघाडीतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

यावेळी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, महेशराव नवले, बाळासाहेब ताजणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिलाध्यक्षा स्वातीताई शेणकर, ज्येष्ठ नेते, उद्योजक सुरेशराव गडाख, संपतराव नाईकवाडी, प्रा. सी. एम. नवले, भागवत शेटे, संदीप शेणकर, बाळासाहेब भांगरे, भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांचेसह महिला कार्यकर्त्या व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या नावे आ. डॉ.लहामटे यांचे व महाविकास आघाडीतील तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाचे शासकीय जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा मेसेज फिरत होता मात्र काल मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विनोद हांडे यांचेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या कोणत्याही महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांनी पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळाले.

रविवारी सकाळी भंडारदरा धरण काठोकाठ भरले. त्यानंतर शेंडी ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि. प. सदस्या सुनीताताई भांगरे, शेंडीचे सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भांगरे यांनी पत्रकारांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाचे विधिवत जलपूजन करत त्यांनी प्रवरा माईला साडी, चोळी, श्रीफळ अर्पण केले होते. धरणाचे एकदा जलपूजन केले असल्यामुळे भांगरे कुटुंबियांनी पुन्हा शासकीय जलपूजन कार्यक्रमास येणे टाळले असल्याची चर्चा आहे. भंडारदरा येथे कार्यक्रम असताना भांगरे कुटुंबियांची अनुपस्थिती ही तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चचा विषय ठरली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी अकोले तालुक्यात मात्र शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, उप जिल्हाप्रमुख रामहारी तिकांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे आदी पदाधिकारी व नेत्यांची जलपूजन कार्यक्रमाच्या मेसेजमध्ये नावे होती मात्र या सर्वांनी एकाच वेळी गैरहजेरी दाखविणे म्हणजेच सर्व काही अलबेल चालले आहे हे न समजण्या इतपत तालुक्यातील जनता दुधखुळी जरूर नाही अशी भावना महाविकास आघाडीतील काही नेते व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या बोलीवर व्यक्त केली. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची नाराजी या निमित्ताने स्पष्ट दिसून आली.

राज्यात आघाडी असली तरी तालुक्यात मात्र बिघाडी असल्याचे यापूर्वी झालेल्या विविध कार्यक्रमांतून दिसून आले आहे. आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपध्दतीविषयी तालुक्यातील त्यांच्याच पक्षासह महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना दिसत आहे. एकंदरितच राष्ट्रवादी अंतर्गत कुरघोडीचे राजकारण व वारंवार उफाळून येणारा तीव्र असंतोष यावर खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भंडारदरा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्कामोर्तब झाल्याचे पहावयास मिळाले होते. पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. जलपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com