जात आणि धर्माच्या फेर्‍यात अडकलेला समाज प्रगती करु शकत नाही - मुणगेकर

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण
जात आणि धर्माच्या फेर्‍यात अडकलेला समाज प्रगती करु शकत नाही - मुणगेकर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

ज्या देशात दारिद्र्य, बेरोजगारी, बकालपणा, शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे सुरक्षेचे प्रश्न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेर्‍यात समाज अडकलेला राहतो. असा समाज कधीही प्रगती करू शकत नाही. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याबरोबरच दलित साहित्य देखील उदयास आले. या साहित्य प्रवाहांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि दीन-दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य दिले अशा साहित्याचा आणि त्यातील मूल्यांचा मी प्रबळ समर्थक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ प्रोफेसर भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकराव रोहमारे होते.

प्रो. मुणगेकर म्हणाले, मी जन्मापासून स्त्रीवादी आहे. आज येथे ज्यांना ग्रामीण साहित्य पुरस्कार दिले गेले, त्यांच्या साहित्यातून स्त्रियांच्या वेदना, त्यांची दमकोंडी आणि त्यांचे प्रश्न अतिशय यथार्थपणे मांडले गेलेले आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्यिक खर्‍या अर्थाने सन्मानाचे पात्र आहेत. कै. के. बी. रोहमारे, त्यांचा भि. ग. रोहमारे ट्रस्ट व त्यांचे के. जे. सोमैया महाविद्यालय हे आदर्श काम करणार्‍या संस्था आहेत. त्यांच्या आदर्शाचे वर्णन या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पुढे आणावे. राजकारण एक अत्यंत आदर्श कला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष अनिवार्य आहे. कारण त्यांच्याशिवाय लोकशाही चालणार नाही.

अशोकराव रोहमारे म्हणाले, आज मुणगेकर यांचे प्रेरक भाषण ऐकून असे वाटले की, गेली 33 वर्षे त्यांच्या भाषणाची आम्हाला प्रतीक्षा होती. यापूर्वी आर्थिक संकटांच्या काळात पुरस्काराबद्दल अनेकदा पुरस्कार पुढे चालू ठेवावा की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होत होता. परंतु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आग्रहामुळे आमचे मनोबल वाढले व हा उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवला. पुढील वर्षापासून साहित्याबरोबरच सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शेती आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान देणार्‍या कर्तृत्वाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्याचा मानस असल्याचेही श्री. रोहमारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या ज्येष्ठ कवयित्री सुमतीताई लांडे म्हणाल्या, कै. के. बी. रोहमारे साहेब व त्यांचे चिरंजीव अशोकराव रोहमारे हे या पुरस्कार योजनेच्या माध्यमातून तसेच उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाची खूप मोठी सेवा करीत आहेत. त्यांचे कार्य हे एका श्रेष्ठ साहित्यिका इतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्रीमती लांडे यांनी केले. कवी लक्ष्मण महाडिक , कादंबरीकार उत्तम बावस्कर, कवी डॉ. सुभाष वाघमारे, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी मार्गदशन केले.

पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. प्रारंभी सहकार्यवाह प्रो. जिभाऊ मोरे यांनी ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी कथन केली. चालू वर्षी उत्तम बावस्कर यांना ‘काळबाटा’ या उत्कृष्ट ग्रामीण कादंबरीसाठी, ज्योती सोनवणे यांना ‘दमकोंडी’ या उत्कृष्ट ग्रामीण कथासंग्रहासाठी, लक्ष्मण महाडिक यांना ‘स्त्री-पुरुषाच्या कविता’ व डॉ. सुभाष वाघमारे यांना ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव‘ या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून तर जी. ए. उगले व डॉ. रामकिशन दहिफळे यांना उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्काराचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 15 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी करून दिला. तर संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. राहुल रोहमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले.

याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्यु. सोसायटीचे सचिव अ‍ॅड. संजीव कुलकर्णी, भि. ग. रोहमारे ट्रस्टचे सचिव रमेश रोहमारे, संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा, संदीप रोहमारे, अ‍ॅड. राहुल रोहमारे, शोभाताई रोहमारे, मंदाताई रोहमारे आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ. गणेश देशमुख, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, सहकार्यवाह डॉ. संजय दवंगे, प्रो. डॉ. के. एल. गिरमकर, प्रो. डॉ. एस. एल. अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com