भाळवणी परिसरात दोन पिल्लांसह मादी बिबट्याचा वावर

भाळवणी परिसरात दोन पिल्लांसह मादी बिबट्याचा वावर

भाळवणी |वार्ताहर| Bhalavani

पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना

दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत या बिबट्याचे दर्शन झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी येथील माजी सरपंच प्रा.बबनराव भुजबळ यांच्या कापरी नदीलगत असलेल्या शेतालगत असलेल्या कुस्ती मैदानाच्या परिसरात सकाळी धुणे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या काही महिलांच्या निदर्शनास ही पिल्ले व मादी आली.

तर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास येथील शेतकरी संजय भुजबळ हे शेतामध्ये काम करत असताना त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सध्या शेतकर्‍यांना विजेच्या उपलब्धतेनुसार रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

यासंदर्भात येथील वनरक्षक श्री. बढे यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणाची पाहणी करून पुढील उपाययोजना काय करता येईल. त्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधू, असे त्यांनी सांगितले तर नागरिकांनी घाबरून न जाता ही मादी व पिले निदर्शनास आल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com