आदित्यनाथ सरकारला भाळवणीच्या कोविड सेंटरची भुरळ

युपीचे मुख्य सचिव तिवारी यांची लंके यांच्याशी फोनवर चर्चा
आदित्यनाथ सरकारला भाळवणीच्या कोविड सेंटरची भुरळ

पारनेर |प्रतिनिधी| Parner

भाळवणी येथील कोविड सेंटरची चर्चा आता महाराष्ट्रच नव्हे तर आता देशभरात होऊ लागली. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने त्याची दखल घेतली आहे. नुकताच उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी आ. निलेश लंके यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून संवाद साधला. 20 मिनिटांच्या या चर्चेमध्ये भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये करोना रुग्णांवरील उपचार, या ठिकाणांची व्यवस्था याबाबत त्यांनी माहिती घेतली.

भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालय शरद पवार आरोग्य मंदिर या नावाने 1 हजार 100 बेडचे कोविड सेंटर सुरू आहे. या कोविड सेंटरमधून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजही मोठ्या प्रमाणात येथे रुग्ण उपचार घेत आहेत. लोकसहभागातून सुरू केलेले हे कोविड सेंटर राज्यासाठी रोल मॉडेल ठरत आहे. येथे रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. राहण्याबरोबरच जेवणाची सोय सुद्धा येथे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर वातावरण आल्हाददायक ठेवण्यासाठी या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अशाच प्रकारचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबत योगी आदित्यनाथ सरकार विचार करत असल्याचे तिवारी यांनी सांगितले. भाळवणी सेंटरमध्ये कशा पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका आणि इतर मनुष्यबळ कसे उपलब्ध केले जाते. रुग्णांच्या जेवणाची सोय कशा प्रकारे केली जाते.

याशिवाय कोणते कोणते कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये चालवले जातात. त्याचे व्यवस्थापन आणि नियोजन कशा पद्धतीने केले जाते. यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी निधीचे नियोजन कसे केले जाते, याबाबतची माहिती उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी यावेळी घेतली. तसेच लवकरच सविस्तर माहिती घेण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ याठिकाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com