
कोल्हार|वार्ताहर|Kolhar
भगवतीपूरमध्ये 90 वर्षीय वृद्ध करोना संक्रमित झाल्यापाठोपाठ त्यांच्याच कुटुंबातील आणखी 5 जण करोना पॉझिटिव्ह आढळले. गावातील आणखी 10 जणांना शुक्रवारी करोना चाचणीकरिता शिर्डी येथे कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
वरील 5 जणांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.
भगवतीपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या आता 6 झाली. या पार्श्वभूमीवर भगवतीपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली असून प्रशासन व आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात सतर्क झाली आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत वैयक्तिक दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
भगवतीपूर येथील वस्तीवर राहणारे 90 वर्षीय वृद्ध करोनाबाधित आढळल्याने त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने शिर्डी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये करोना चाचणीकरिता गुरुवारी दाखल करण्यात आले होते.
त्यांचे अहवाल काल शुक्रवारी प्राप्त झाले असून त्या एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती करोनाबाधित असल्याचे अहवाल मिळाले. उपरोक्त 5 जणांवर शिर्डी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुढील उपचार सुरू करण्यात आले. शुक्रवारी आणखी 10 जणांना चाचणीकरिता शिर्डीच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येत आरोग्य यंत्रणेला नावे कळवावीत. शासनाला सत्य माहिती दिल्यास उपाययोजना करणे सुलभ जाईल. सरकारी यंत्रणेला याकामी सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांनी केले आहे.