भागडा चारीच्या वीजबिलासाठी 47 लाख मंजूर

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती
भागडा चारीच्या वीजबिलासाठी 47 लाख मंजूर
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेच्या वीजबिलासाठी 47 लक्ष 22 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे थकीत विद्युत देयक भरण्यासाठी जलसंपदा विभागाने 47 लक्ष 22 रुपयांचा निधी वितरीत केला असल्याची माहिती नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. पश्चिम भागात कनगर, चिंचविहीरे, वडनेर, गणेगाव, तांभेरे, गुहा या गावांसाठी वरदान ठरणार्‍या भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे वीज बिल थकीत होते. यासंदर्भात येथील लाभधारक शेतकर्‍यांनी वेळोवेळी ना. तनपुरे यांच्याकडे मागणी करुन वीजबिल भरण्याकामी निधी मिळावा, यासाठी आग्रही मागणी केली होती.

यावर मंत्री तनपुरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करुन योजनेच्या थकीत वीज देयकासाठी निधीची आग्रही मागणी केली होती. त्यावर ना. पाटील यांनी शासन पातळीवर त्वरीत निर्णय घेऊन 47 लक्ष 22 हजारांचा निधी भागडा चारीसाठी विद्युत देयक रक्कम भरणेकामी प्राप्त झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाचे दि.03 / 09/2019 रोजी झालेल्या निर्णयान्वये उपसा जलसिंचन योजनेच्या वीज देयकांमधील 81 टक्के वाटा महामंडळास प्राप्त होणार्‍या बिगर सिंचन पाणीपट्टीतून भागविण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार उपसा जलसिंचन योजनांच्या वीज देयकांबाबत निधी मागणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करतांना 81 टक्के रक्कमेप्रमाणे निधी मागणी करण्यात यावी, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. हा निधी प्राप्त झाल्याने भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष सुयोग नालकर, उपाध्यक्ष विजय नरोडे, सचिव किरण गव्हाणे व परिसरातील लाभ धारक शेतकर्‍यांनी मंत्री तनपुरे व मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com