भगरीने केला कहर; विषबाधेचे लोण कोपरगावातही

भगरीने केला कहर; विषबाधेचे लोण कोपरगावातही

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भगर खाल्ल्यामुळे अनेक महिला-पुरुषांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी घडली आहे. अशीच घटना कोपरगाव शहरात घडली असून पॅकिंग केलेल्या भगरीच्या पिठापासून बनविलेले पदार्थ खाल्याने तीन जणांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे .

शहरातील धरम कानकुबजी यांनी बाजारातुन बंद पाकीट मधील भगरचे पिठ आणून त्याचे बनवलेले पदार्थ खाताच त्याच्यासह त्याची पत्नी व मुलीस उलट्या जुलाब सुरू झाल्याने त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर धरम कानकुबजी व त्यांच्या कुटुंबियांना घरी सोडण्यात आले आहे. सदर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन यादव यांना विचारले असता त्यांना भगरीतुन विषबाधा झाल्याच्या वृत्तला दुजोरा दिला आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन यादव यांनी अधिक माहिती देत नागरिकांना आवाहन केले आहे.

भगरीतुन विषबाधा होत असल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले असून ऐन नवरात्रीत नागरिकांनी भगरकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असतानाच याबाबत संबंधित प्रशासनाने अजून काही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. आता अन्न भेसळ विभाग यावर काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com