
अहमदनगर (प्रतिनिधी)
अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. गणेश हुच्चे, नंदू बोराटे अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, काल मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील संदीप गुडा पसार आहे.
ओंकार भागानगरे, ओंकार घोलप व इतरांनी सोमवारी (दि. 19) दुपारी गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावरून कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात हुच्चे व भागानगरे, घोलप यांच्यात वाद झाले. त्याच रात्री बालिकाश्रम रस्त्यावर टोळीने केलेल्या हल्ल्यात ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. शुभम पडोळे हा गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी घोलपच्या फिर्यादीवरून गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर तिघे पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्या मागावर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणेश हुच्चे व नंदू बोराटे यांना पुणे येथून ताब्यात घेतले आहे. सागर गुडा याच्या मागावर पोलीस पथक असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.