स्वस्त धान्य दुकानाबाबत कार्डधारकांच्या गंभीर तक्रारी
सार्वमत

स्वस्त धान्य दुकानाबाबत कार्डधारकांच्या गंभीर तक्रारी

संतप्त ग्रामस्थांनी तालुका पुरवठा अधिकारी व कामगार तलाठ्यांना दिले निवेदन

Arvind Arkhade

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimplegav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील कामधेनू संस्थेमार्फत गावात स्वस्त धान्य दुकान सुरू असून या ठिकाणी होत असलेल्या मनमानी कारभाराविरोधात गावातील शेकडो नागरिक एकवटले आहेत.

लॉकडाऊन काळात शासनाने नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र बेलपिंपळगाव येथील बहुसंख्य रेशनकार्डधारक या धान्यापासून वंचित ठेवण्यात आले असून त्यामुळे रेशनकार्डधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेशनदुकानासाठी धान्य उचलले जाते मात्र ते कार्डधारकांपर्यंत पोहचत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

येथील धान्य वितरणाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानात कार्डधारकांना कसलेही बिल दिले जात नाही. धान्य मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा नाही. देखील वजनात कमालीची तफावत आहे. बिल नसल्याने चढ्या दरानेधान्य दिले जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

संतप्त कार्डधारकांनी काल नेवासा तालुका पुरवठा अधिकारी श्री. गोरे यांना ही माहिती कळवून त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर धान्य दुकानदार व ग्राहक यांच्याशी समोरासमोर चर्चा करत असताना अनेक त्रुटी आढळून आल्या. या घटनेचे गांभीर्य मोठे असल्याने स्वतः श्री. गोरे यांनी याबाबत लक्ष घालून यापुढे असा कुठलाही प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली.

यावेळी यापुढे गावात धान्य दुकानदाराच्या वाटपामध्ये तफावत आढळल्यास व इलेक्ट्रॉनिक काटा, प्रत्येकाला बिल, आलेल्या धान्याची बोर्डवर माहिती व गावातील दक्षता कमिटी यांना आलेला माल व विकलेला माल तसेच शिल्लक माल याची माहिती देणे बंधनकारक राहील.

माहिती संबंधित दुकानदाराला ग्रामपंचायतच्या बोर्डवर प्रसिद्ध करावी लागेल. अशी हमी ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा अधिकारी यांच्या कडून घेतल्याने होणारे जनआंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. पुढील महिन्यात असे न झाल्यास ग्रामस्थ नेवासा तहसील कार्यालय समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

माजी सरपंच राजेंद्र साठे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक शिंदे, माजी चेअरमन बाबासाहेब गटकळ, माजी सरपंच बाळासाहेब तर्‍हाळ, तंटामुक्ती उपाध्यक्ष सुभाष साठे, अमोल कोकणे, आबासाहेब शेळके, रमेश गटकळ, बाबासाहेब कांगुणे, बाळासाहेब पुंड, आदिनाथ पुंड, दिगंबर कांगुणे, योगेश शिंदे, सामजिक कार्यकर्ते कृष्णां शिंदे, किशोर गारुळे, माजी चेअरमन भीमजी साठे, बापूसाहेब औटी, पोलीस पाटील संजय साठे, तलाठी सोपान गायकवाड, सागर साठे, संजय कवडे, ज्ञानेश्वर गटकळ, शिवाजी साठे, भीमजी सुरसे, भाऊसाहेब सरोदे, पोपट सरोदे, रमेश कांगुणे, बाबासाहेब साठे, अशोक कांबळे, आबा कोकणे, देवराव साठे, आबासाहेब तागड आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात शासनाने गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करताना डाळ देखील दिली होती. पण गावातील स्वस्त धान्य दुकानात कोणालाही डाळ मिळाली नाही. याची माहिती पुरवठा अधिकारी यांना दिली असून यावर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.

- बाबासाहेब गटकळ माजी अध्यक्ष, हनुमान सोसायटी

गेल्या पाच महिन्यापासून करोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नाही. त्यामुळे पैसा नाही. या परिस्थितीत मात्र शासनाने गोरगरीब जनतेला मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला पण बेलपिंपळगावातील कार्डधारक यापासून वंचित राहत आहेत. मोफत धान्य येथील रेशनकार्डधारकांना मिळाले नाही तर यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल.

- राजेंद्र साठे, माजी सरपंच, बेलपिंपळगाव

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com