तोडणीअभावी बेलपिंपळगाव परिसरातील शेतकरी पेटवू लागले उभा ऊस!

शेकडो एकरावर 17 ते 18 महिन्यांचा जवळपास खोडक्या झालेला ऊस || कांद्यानेही रडवल्याने शेतकरी हतबल
तोडणीअभावी बेलपिंपळगाव परिसरातील शेतकरी पेटवू लागले उभा ऊस!

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

पावसाळ्याची चाहुल लागली तरी 17 ते 18 महिन्यांचे शेकडो एकर ऊस पिक अद्यापही शेतात उभे असून जवळपास खोडक्या झालेला हा ऊस जाण्याची व गेला तरी एकरी दहा ते पंधरा हजार खर्च करुन हाती काय उरेल? याचा विचार करुन अनेक शेतकरी ऊस पेटवून देवू लागले आहेत. उसाची ही अवस्था तर अल्प कालावधीचे नगदी पिक असलेल्या कांद्याचीही भावाअभावी वाईट अवस्था असल्याने शेतकर्‍यांना कोणते पीक घ्यावे असा प्रश्न पडला असून शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या सर्व जगाचा पोशिंदा असणारा कष्ट करी शेतकरी मेटाकुटीला आला, असून त्याला कोणी वाली राहिले नाही. अशीच परिस्थिती नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील शेतकर्‍यांची झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून येणार्‍या अस्मानी संकटाला तोंड देत कसाबसा सावरत शेतकरी आपलं काम करत आहे. कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी पूर परिस्थिती यातच या कष्टकरी शेतकर्‍याच मरण झालं, हक्काचं पाणी मिळायला उशीर तर कधी पाणी असून विजेच्या समस्या यातून मार्ग काढत हा शेतकरी काबाडकष्ट करून आपला संसार चालवत जगाला देखील अन्नधान्य पुरवत असतो, पण यावर्षी बेलपिंपळगाव व परिसरातील सर्व शेतकरी हातघाईवर आले आहे. याला कारण म्हणजे पावसाळ्याची चाहूल लागली तरी देखील शेकडो एकर क्षेत्रावर आज देखील ऊस पीक सतरा ते आठरा महिने होऊन देखील उभे आहे.

आज ते कारखान्यात गळपासाठी जातील की नाही? याची खात्री नाही. जर तोडणी मिळालीच तर एकरी दहा ते पंधरा हजार रुपये प्रति एकरी खर्च मोजावा लागत आहे. आज मितीला त्या उसाला वजन नाही तो ऊस गावातील शेतकरी आपल्या हाताने पेटवून देत आहेत. रोज गावात किमान दोन ते तीन शेतकरी आपला काबाडकष्ट करून पोटच्या पोरासारखं जपलेल पीक आपल्या हाताने डोळ्यात अश्रू आणून पेटवत आहेत. लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी कारखानदार यांनी प्रयत्न केले पाहिजे.

तशीच परिस्थिती कांदा पिकाची झाली आहे. या भागात अनेक शेतकरी कांदा उत्पादक असून एकरी हजारो रुपये खर्च करून हे पीक घेतात पण या काही दिवसात कांद्याला मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा कसा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील अनेक शेतकर्‍यांनी प्रति किलो एक रुपये प्रमाणे कांदा विकला असून त्यांचा खर्च देखील वसूल झाला नाही. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी मेटाकुटीला आले असून बोलतात उसाने जाळलं आणि कांद्याने रडवल पुढील वर्षी मात्र या भागात ऊस व कांदा क्षेत्र निश्चितच भविष्यात कमी होतील, असे चित्र या परिसरात दिसून येत आहे. इतके काबाडकष्ट करून ,मरमर करून रात्रंदिवस जागून जर आज जर अशी परिस्थिती या जगाच्या पोशिंद्यावर येत असेल तर भविष्यात तरुणांनी या क्षेत्रात यावं का नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मी एक एकर क्षेत्रावर कांदा पीक घेतले, चांगल्या प्रकारे खर्च करून काबाडकष्ट करत हे कांदा पीक उत्पादन घेतले. पण ज्यावेळी मी कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो तर माझ्या मालाला प्रति किलोला एक रुपये भाव मिळाला. त्यामुळे मी उर्वरित जवळपास निम्मा कांदा शेतात टाकून त्यावर ट्रॅक्टरचा रोटा मारून टाकला. भविष्यात जर कांद्याला आणि शेतीमालाला भाव मिळाला नाही तर मात्र शेती करावी का नाही? असा प्रश्न पडला आहे.

- विजय गोसावी, शेतकरी, बेलपिंपळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com