बेलपिंपळगाव परिसरात पाऊस जोमात; शेती कोमात

बेलपिंपळगाव परिसरात पाऊस जोमात; शेती कोमात

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरातील जैनपूर, घोगरगाव, बेलपांढरी या गावांमध्ये यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला. शेतकर्‍यांनी मशागतीची कामे करून पेरणी केली मात्र शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

शेतकर्‍यांनी सोयाबीन, बाजरी, मका, तूर, कपाशी, मूग तसेच जनावरांसाठी चारा पिकांची पेरणी केली. पण गेल्या पंधरा ते वीस दिवसांत संततधार पावसाने उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले असून त्यामुळे दुबार पेरणीची संकट उभे राहिले आहे. रोजच्या रिमझिम पावसाने पिकांपेक्षा गवतच जास्त वाढल्याचे दिसत आहे. गवत काढण्यासाठी मजूर मिळत नाही तसेच तणनाशकाच्या वाढत्या किमती याचा शेतकर्‍यांना ताळमेळ लागत नाही. तणांची वाढ एवढी झाली आहे की महागडी तणनाशके वापरुनही उपयोग होत नाही. त्यामुळे त्या पिकात परत नांगर घालण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असून दुबार पेरणीची संकट उभे राहिल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

काहींच्या शेतात पिकं चांगली आली पण पाऊस आला जोमात आणि शेती गेली कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, मका अती पाण्यामुळे पिवळी पडत असल्याने तसेच काहींच्या शेतात ती पाण्यात सडत असल्याने दुबार पेरणी करावी लागणार असे चित्र तयार झाले आहे. महागडी बी बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत आहे तसेच रासायनिक खतांचे भाव देखील गगनाला भिडले असताना दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मजुरांचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शेतीच्या कामाला सध्या मजूर मिळत नाही. तीनशे रुपये रोजंदारी देऊन देखील मजूर मिळत नसल्याने हा देखील मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे,

यापूर्वी या भागात शेतकरी उसाचे पीक घेत होता. पण मागील काही दिवसांत ऊस पिकाने शेतकर्‍यांना रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी या पिकांना पसंती दिली पण या पिकांची दुबार पेरणी करावी लागणार अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या खर्चाचा कसा ताळमेळ घालावा हा देखील प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी बोलत आहेत पाऊस आला जोमात आणि शेती गेली कोमात त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com