बेलपिंपळगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या पावसाकडे नजरा

बेलपिंपळगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या पावसाकडे नजरा

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वरुणराजाचे जोरदार आगमन झाले असून शेतकरी पेरणी करताना दिसत आहेत मात्र नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरात शेतकरी मात्र पावसाकडे नजरा लावून बसलेला दिसत असून पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.

पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अजून या भागात वरुणराजाने हजेरी लावली नसल्याने सर्वच शेतकरी पेरणीसाठी खोळंबले आहेत. या भागात शेतकरी प्रामुख्याने ऊस पिक घेतात. पण यावर्षी उसाने रडवल्याने शेतकरी सोयाबीन व कपाशी पिके अधिक घेणार असल्याचे दिसून येत आहे. अल्प प्रमाणात बाजरी, तूर, मका, भुईमूग अशी पिके घेतली जातात. मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत आता शेतकरी राजा फक्त कधी पाऊस पडतो याची वाट बघत आहे.

मागील वर्षी या भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडला होता. यावेळी मात्र अजून पाऊस पडला नसल्याने शेतकरी मात्र आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. आधीच पेरणी करावी तर जर पाऊस उशिरा पडला तर मोलामहागाचे बी वाया जाणार आणि दुबार पेरणी करावी लागेल.

एकरी जमीन पेरणीसाठी तयार करायची ठरली तर वाढत्या महागाईमुळे हजारो रुपये खर्च येतो. बी-बियाच्यांचे दर वाढले असून रासायनिक खतांच्या किमती देखील वाढल्याने काय करावे असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या धास्तीने अनेक शेतकरी हातावर हात देऊन पावसाळ्यात पावसाची वाट बघत असल्याचे चित्र बेलपिंपळगाव परिसरात बघायला मिळत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही होताना नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उष्णतेने घामाच्या धारा निघत आहे तर रात्री वारा सुटत असल्याने काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाऊस नसल्याने रोजंदारीवर कामाला जाणार्‍यांच्या हाताला काम नसल्याने ते कामगार देखील कधी एकदा पाऊस पडतो या आशेने रोज आभाळाकडे नजरा लावून आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा व पेरणी करून शेतकरी समाधानी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com