बेलपिंपळगावच्या अनेक शेतकर्‍यांची खंडीत विजेच्या कटकटीतून मुक्तता

आतापर्यंत 300 शेतकर्‍यांनी घेतला सौरपंप योजनेत सहभाग
बेलपिंपळगावच्या अनेक शेतकर्‍यांची खंडीत विजेच्या कटकटीतून मुक्तता

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील असंख्य शेतकर्‍यांनी नित्याने खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याला वैतागून सौरपंपाला पसंती दिली आहे. या भागातील शेतकरी सुखावल्याने वारंवार विजेच्या खंडित होण्याची कटकट कायमची मिटल्याने या भागात एक प्रकारची समृद्धीच आली आहे.

बेलपिंपळगाव परिसरात गेल्या अनेक वर्षापासून कांदा, ऊस लागवड केली की, महावितरणच्या रोहित्रांवर अतिरिक्त ताण येऊन तो नादुरुस्त होणे, ऑईल फेकणे असे अनेक प्रकार घडतात. तसेच दिवसाचा वीजपुरवठा असला तर सगळीकडे विद्युतमोटारी सुरु करून पाणी भरण्याची धावपळ सुरू असायची. त्यात ‘ती’ आली... आली अन् गेली गेली..., वाफा ते मोटारीच्या खोक्यापर्यंत चकरा मारून शेतकरी हैराण होत.

रात्रपाळीतही दिवसभर काम करून दमलेल्या शेतकर्‍यांना रात्र डोक्यावर काढावी लागे. मात्र, आता गावात जवळपास 300 शेतकर्‍यांनी सौरपंप योजनेत सहभाग घेतला. आणि आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवल्याने मोठे कष्ट कमी झाले. सकाळी सुर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देत आहेत.आणि रात्री सुखाने आपल्या घरी झोप घेत असल्याचे चित्र गावात बघावयास मिळत आहे.

या कामी कुसुम सौर ऊर्जा कंपनी (महाऊर्जा) चे अभियंता ज्योती कर्जने, आप्पासाहेब ठाणगे यांचे शेतकर्‍यांना सौर पंप बसवण्यासाठी मोठे सहकार्य लाभले तसेच महावितरण चे देखील मोठे योगदान आहे. या सौर ऊर्जा पंपाने वीज बिल कमी झाले. वीजपंपाचे खोके ते वाफा यांच्या चकरा बंद झाल्या आणि रात्रपाळी करण्याची गरज संपली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com