बेलपिंपळगावचे सुमारे 40 टक्के शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित

उर्वरित शेतकर्‍यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी
File Photo
File Photo

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील अनेक शेतकरी 2022 च्या पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. शेतकर्‍यांनी तक्रार नोंदवल्यावर पंचनामे झाले मात्र विमा कंपनीकडून कसलीही दखल घेतली नाही व अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.

अतिवृष्टी झाली. अनेकांची उभी पिके पाण्यात गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात पंचनामे झाले पण अजून देखील नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात आतादेखील गहू, हरभरा, कांदा ही पिके अचानकपणे आलेला पाऊस व खराब हवामानामुळे हातातून जाणार असून याची नुकसान भरपाई कधी मिळते, मिळते की नाही याबाबत साशंकताच आहे. परिसरातील गावांमध्येही अशीच परिस्थिती आहे.

त्यामुळे लवकरात लवकर पीक विमा कंपनीने उर्वरित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी व शासनाने देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम लवकर जमा करावी. गावातील सुमारे दीड हजार शेतकर्‍यांनी पीक विमा भरला मात्र जवळपास 40 टक्के शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले असून लवकरच त्यांना नुकसान भरपाई मिळावी व अतिवृष्टी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

माझी बेलपिंपळगाव येथे शेती असून मी गट नंबर 364/2 चा 80 आर क्षेत्राचा विमा भरला होता. तीन वेळा रितसर पंचनामा झाला. दोन वेळा विमा प्रतिनिधी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली तरीदेखील मला नुकसान भरपाई मिळाली नाही. मला व गावातील राहिलेल्या शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी.

- बाळासाहेब शिरसाठ, शेतकरी, बेलपिंपळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com