बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या बेलपिंपळगावची ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असून गावात निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले आहे.

तेरा जागांसाठी मतदान होणार असून गावात सध्या चौका चौकांत, वाडी वस्तीवर कोणाला मिळणार संधी, कोणाला डावलणार अशा अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.

गावात यावेळी निवडणुकीमध्ये गावातील झालेल्या व राहिलेल्या विकास कामांवरून निवडणूक होणार हे मात्र नक्की आहे.

गावात पॅनल करताना जुने नवे यांचा मेळ घालणं देखील मोठी डोकेफोड होणार आहे. गावात अनेक दिग्गजांचे अस्तित्व पणाला लागणार असून कोण बाजी मारेल हे मात्र 18 जानेवारीला मतमोजणी झाल्यावरच समजणार आहे.

यावेळी सरपंच पद कोणाला राखीव आहे हे निवडणुकीनंतर समजणार असून त्यामुळे अनेकांच्या मनाचा हिरमोड झाला आहे.

गावात नात्यागोत्याचं राजकारण जास्त चालत असून तशा पध्दतीने प्रभागनिहाय उमेदवार शोध मोहीम सुरू आहे.

या निवडणुकीत तरुण नेतृत्व पुढे येत असून त्यांना यात किती यश मिळेल याची देखील उत्सुकता शिगेला जाणार आहे.

अनेक आजी माजी सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. त्यामुळे गावात सध्या कोण कोणाच्या गळ्यात हात घालून राहणार हे बघणे देखील उत्सुकतेचे राहील. येणार्या काही दिवसांत गावातील राजकारण ढवळून निघणार आहे. बेलपिंपळगाव येथे एकूण पाच प्रभाग असून प्रभाग एकमध्ये तीन जागा आहेत.

यामध्ये 681 मतदार आहेत. प्रभाग दोन मध्ये दोन जागा असून या वॉर्डात एकूण 1108 मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक तीन मध्ये दोन जागा असून या वॉर्डात 710 मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक चार मध्ये तीन जागा असून यात एकूण 765 मतदार आहेत तसेच वॉर्ड क्रमांक पाचमध्ये तीन जागा असून यात 842 मतदार आहेत.