बेलापूरला पाणीपुरवठा करणार्‍या टाकीत आढळला प्रचंड गाळ

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
बेलापूरला पाणीपुरवठा करणार्‍या टाकीत आढळला प्रचंड गाळ

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर गावाला दूषित पाणी पुरवठा करणार्‍या पाणी टाकीतील ब़र्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून या टाकीत चार ते पाच फुटापर्यंत गाळ साचला असल्याचे आढळून आले आहे. हेच गाळमिश्रीत पाणी बेलापूर व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून बेलापूर व परिसराला दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सदस्य भरत साळुंके, रवींद्र खटोड, सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी केल्या होत्या. त्यानंतर गावकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना दिल्या. यावर उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. बैठकीत अनेक वर्षांपासून टाकी स्वच्छ केली नसल्याचे चर्चेतून समोर आले. त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली असता टाकीत चार ते पाच फुटापर्यंत गाळ साचलेला असल्याचे आढळून आले. हेच गाळमिश्रीत पाणी बेलापूर व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते. मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टाकी स्वच्छ केल्याची तारीख, महिना, वर्ष सापडले नाही, यावरून अनेक वर्षापासून नागरिक गाळमिश्रीत पाणीच पित होते हे उघड झाले. दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे माहीत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले. आरोग्य विभागही याबाबत अनभिज्ञ होता. पाण्याच्या टाकीत साचलेला प्रचंड गाळ वरून पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता व तेच ढवळलेले गाळमिश्रीत पाणी नागरिकांना पिण्यासाठी येत होते, हे या निमित्ताने समोर आले आहे.

याबाबत सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले की, बैठकीतील चर्चेनुसार ग्रामपंचायतीने 5 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. त्यानंतर 2 लाख लिटरच्या टाक्यादेखील स्वच्छ करण्यात येणार आहेत. मुख्य टाकीवरील पाण्याचे सर्व हौदही गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत. यापूर्वी अमरधाम, खटकळी-गावठाण, 20 घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. सातभाईवस्ती, गायकवाडवस्ती, कुर्‍हेवस्ती, रामगड, सुभाषवाडी येथील टाक्याही लवकरच साफ करण्यात येतील. परिसरात असणार्‍या सर्वच बारा टाक्यांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी व टाकी केव्हा स्वच्छ केली त्याची ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com