
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
केवळ आवड आणी सर्प संवर्धन करायचे म्हणून सर्पमित्र बनलेल्या बेलापूर येथील राजश्री आल्हाट-अमोलिक या विवाहित तरुणीचे गेल्या सहा वर्षात सुमारे 600 ते 700 विषारी व बिनविषारी सर्प पकडून ते निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे.
बेलापूर येथे सासर असणार्या राजश्री आल्हाट-अमोलिक या तरुणीस सर्पमित्र का बनावे वाटले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, वयाच्या सहाव्या वर्षापासून सर्प पकडण्याची आवड निर्माण झाली. मात्र त्यावेळी सर्प कसे पकडावे याचे प्रशिक्षण नव्हते त्यामुळे ते पकडता येत नव्हते. दुसरे कोणी सर्प पकडत असेल त्यावेळी बारकाईने निरीक्षण करत असे. ते पकडता येत नसल्याची सल मनात होती. मी नगर येथे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात नोकरी करत असताना तेथील सर्पमित्र आकाश जाधव यांच्याकडे सर्प पकडण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यावेळी विषारी सर्प कोणते, बिनविषारी सर्प कोणते याची माहिती झाली. या काळात कोल्हापूरचे सर्पमित्र संभाजी चौगुले यांचेही मार्गदर्शन लाभले. माझे महाविद्यालयीन शिक्षण हे श्रीरामपूर येथेच बोरावके महाविद्यालयात झाले. मी राज्यशास्त्र विषयात एम. ए. केले आहे. माझा विवाह बेलापूरचे निलेश अमोलिक यांचेबरोबर झाला. पती आर्मिमध्ये मेजर या पदावर सध्या नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. माझे कराटेचेही प्रशिक्षण घेतले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त केली आहेत. सर्प पकडण्यासाठी फोन आले तर आवड असल्यामुळे तातडीने जाते. एकदा तापाने फणफणत असताना तर एकदा मी 9 महिन्याची गरोदर असतानाही सर्प पकडण्यासाठी गेले होते. गेले होते.
मी गेल्या सहा वर्षात विषारी व बिनविषारी किमान 600 ते 700 सर्प पकडले. यात नाग, घोणस, मणियार याचा समावेश आहे. सर्प पकडल्यानंतर विषारी सर्प हे निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडले जातात तर बिनविषारी सर्प हे आमच्या शेतात सोडत असते. कारण सर्प हा शेतकर्यांचा मित्र आहे. त्यामुळे त्याला मारू नका असे आवाहनही त्यांनी केले. सर्प जिवंत राहिला पाहिजे हेच आम्हाला आमच्या सर्प पकडण्याच्या प्रशिक्षणातून शिकविले जाते. त्यामुळे सर्प पकडताना त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. सर्प पकडताना आतापर्यंत मलाही कोणतीही इजा झाली नसल्याचे सौ.राजश्री आल्हाट-अमोलिक यांनी सांगितले.