बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी फडणवीस यांचे पत्र ‘वरचेवर’

खासदार लोखंडे यांच्या दाव्याने रेल्वे प्रवासी सेवा संस्थेला आश्चर्य; पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार
बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी फडणवीस यांचे पत्र ‘वरचेवर’

कुकाणा |वार्ताहर| Kukana

बेलापूर - परळी रेल्वे मार्गासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या 50 टक्के सहभागाचे दिलेले पत्र ‘वरचेवर’ होते. त्यामुळे आता सध्याच्या राज्य शासनाचे पत्र आवश्यक राहणार असून त्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे स्पष्टीकरण खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांना दिले.त्यावर पदाधिकार्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले असून पुन्हा पाठपुरावा, प्रयत्न सुरु करण्याचा निर्धार केला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे याची भेट घेतली असता फडणवीस सरकारने जरी पत्र दिलेले असले तरी सध्याच्या राज्य शासनाचे प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के सहभागाचे पत्र आवश्यक असून ते मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते पत्र वरचेवर दिले असल्याने पुन्हा नवीन पत्राची गरज असल्याचे वक्तव्य केले. बेलापूर-परळी या 100 वर्षे प्रलंबीत लोहमार्गाचे कामास चालना मिळण्यासाठी बेलापूर-परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खा. लोखंडे यांची भेट घेतली असता खा. लोखंडे यांनी वरील उत्तर दिल्याने यापुर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले पत्र अधिकृत नाही काय? याबाबत कार्यकर्त्यात संभ्रमावस्था आहे.

तीन वर्षांपूर्वी खा.लोखंडे यांनी राज्य शासनाच्या 50 टक्के सहभागाचे पत्र घेवून आल्यास केंद्राची जबाबदारी माझी असे म्हटले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या सहीने 8 मार्च 2019 रोजी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना दिले होते व याच पत्राची प्रत प्रवासी सेवा संस्थेला देण्यासाठी कुकाणा येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात खा.लोखंडे यांच्या हस्ते या पत्राची प्रत देण्यात आली. मग आताच खा. लोखंडे असं का म्हणाले ? त्यांनी हे पत्र वरचेवर असल्याचे वक्तव्य का केले? यावर सेवा संस्थेचे मागणी पत्र द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची एकत्र बैठक घेऊ असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. तसेच मागणी पत्रसोबत पूर्वी मिळालेले 50 टक्के खर्चाचे पत्र जोडून द्या , असेही लोखंडे यांनी सांगितले.

या पत्रासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी डिसेंबर 2017 मध्ये कुकाणा येथे 7 दिवस आमरण उपोषण केले होते. तर ऑगस्ट 2018 मध्ये मंत्रालय, मुंबई येथे आत्मदहन प्रयत्न तसेच डिसेंबर 2018 मध्ये पुन्हा कुकाणा येथे 5 दिवस आमरण उपोषण असा संघर्ष केलेला आहे. आता संस्थेचे कार्यकर्ते या मार्गावरील सर्व आमदार, खासदार यांची भेट घेऊन प्रलंबीत लोहमार्गासाठी प्रयत्नशिल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com