गाव व परिसरात दूषित पाणी येण्याचे कारण काय?

गाव व परिसरात दूषित पाणी येण्याचे कारण काय?

बेलापूर येथे आयोजित बैठकीत सदस्यांचा सवाल

बेलापूर |वार्ताहर| Belapur

गावाला पाणी पुरवठा करणार्‍या जल वाहिनीतून दोन महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. दूषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे? असा सवाल माजी सरपंच भरत साळुंके व माजी उपसरपंच रविंद्र खटोड यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत सत्ताधार्‍यांना केला.

गेल्या काही दिवसापासून बेलापूर व परिसराला दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत रविंद्र खटोड, भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी पुरवठ्याच्या तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी पाण्यात टीसीएल, तुरटी टाकण्यात अडचण येते का? नळाला क्षारयुक्त पाणी का येते? असा प्रश्न चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणीपुरवठा करणा़र्‍या जल वाहिनीला लिकेज असल्यामुळे दूषित पाणी येत असून दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार, काम पूर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले, असा सवाल केला.

बेलापूर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणार्‍या एकुण बारा टाक्या असून या टाकीची बर्‍याच दिवसांपासून स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली. टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आले असून तातडीने सर्व पाणी साठवण टाकी साफ केली जाईल, असे आश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली पाहिजे, परंतु तसे होत नाही, पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्या तक्रारीचा सूर यावेळी होता.

यावेळी सरपंच महेंद्र साळवी म्हणाले, गावाला चांगले पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल. स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे. पाटामधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे. त्याबाबत इरिगेशन खात्याकडे लेखी तक्रार केली आहे. पाणीपुरवठ्याबाबत काही सूचना असेल तर त्याचीही दखल घेतली जाईल. उपसरपंच खंडागळे म्हणाले, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा, अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते. स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना त्वरित करण्यात येतील.

पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले. त्यावेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न साळुंके यांनी विचारताच ओ टी काय असते, असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला. यावेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे, अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीने स्वतःहुन पाणीपुरवठ्याबाबत बैठक बोलावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सदस्य मुस्ताक शेख, शफीक बागवान, पुरुषोत्तम भराटे, मोहसीन सय्यद, राम पोळ, प्रसाद खरात, गोपी दाणी, ईस्माईल शेख, समीर शेख, गफुर शेख, अजीज शेख, सचिन अमोलिक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. महेंद्र मीश्राम, प्रशांत गायकवाड, तान्हाजी गडाख, संतोष शेलार, अजीज शेख, रमेश अमोलिक, रमेश कुमावत, बाबुलाल पठाण, गोविंद खरमाळे, सतीश मोरे, तसवर बागवान आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com