बेलापूर खुर्द हॉटस्पॉट घोषित; कडक लॉकडाऊन

बेलापूर खुर्द हॉटस्पॉट घोषित; कडक लॉकडाऊन

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर खुर्दमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासनाने दि.7 ऑक्टोबरपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केल्याने येथील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

बेलापूर खुर्द गावात 15 करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी काही बरेही झाले आहेत. मात्र पुढील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यासंदर्भात श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आदेश जारी केला असून त्यानुसार येत्या 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, औषध दुकाने यासह सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या काळात गावात वाहनांना ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

दरम्यान, गावातील करोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली असून पुढे सणासुदीचे दिवस असल्याने गावातील व्यवहार शिथील करण्याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांना भेटून विनंती करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अ‍ॅड. दीपक बारहाते, माजी सरपंच सुनील क्षीरसागर, संतोष बडधे, वसंत पुजारी, अशोक आहेर, डॉ. मिलिंद बडधे पाटील, विनय भगत, सतीश भगत, गणेश संचेती, राजेंद्र कुंकूलोळ, अनिल गाढे यांनी सांगितले.

बेलापूर खुर्द गावात आत्तापर्यंत 15 रुग्ण आढळून आले असून काही रुग्ण बरे झाले आहेत. बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. गावात रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून रुग्ण असणार्‍या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.

- डॉ. देविदास चोखर, आरोग्याधिकारी बेलापूर.

बेलापूर खूर्दला आज रोजी जास्त रुग्ण संख्या दिसत असली तरी यातील बरेचसे रुग्ण बरे झाले आहेत. केवळ दोन तीन जणच पॉजिटीव्ह आहेत. शासनाकडे अहवाल उशिरा आला, तोपर्यंत रुग्ण बरे झाले होते. रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतल्या आहेत.गावात सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- अ‍ॅड. दीपक बारहाते, उपसरपंच, बेलापूर खुर्द.

Related Stories

No stories found.