बेलापूर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

कर्मचार्‍यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे प्रश्न अनुत्तरित-पदाधिकार्‍यांचा खुलासा
बेलापूर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील ग्रामपंचायतीच्या विविध विभागात काम करणार्‍या महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या कर्मचार्‍यांनी पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी गुरुवारपासून सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन काल तिसर्‍या दिवशीही तोडगा न निघाल्याने आज सुरुच राहणार आहे.

दरम्यान, गुरुवारी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यानंतर शुक्रवारी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन ग्रामपंचायतीच्यावतीने सुनील मुथा यांनी प्रस्ताव मांडून या आंदोलनात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही यश आले नाही.

त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भुमिका महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे सरचिटणीस कॉ.जीवन सुरुडे, राजेंद्र बावके, कृष्णा बडाख व आंदोलकांनी घेतली आहे. आज तिसर्‍या दिवशी मात्र मागण्यांच्या संदर्भात तडजोडीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच राहणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या आंदोलनाबाबत ग्रामपंचायत प्रशासन हे संवेदनशील आहे. त्यामुळेच दोनदा या प्रश्नावर चर्चा करुन आठशे रुपये वेतनवाढ व दोनशे रुपये इंक्रीमेंट अशी एकुण एक हजार रुपयांची भरीव वाढ देण्याची तयारी दर्शवून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पंचायतीची आर्थिक स्थिती, वार्षिक उत्पन्न विचारात घेऊन तसेच देऊ केलेली वाढ मान्य करुन प्रश्न मिटवायला पाहिजे होता. मात्र कर्मचारी आडमुठेपणाची भुमिका घेत असल्याने त्यातून मार्ग निघू शकला नाही. असा खुलासा सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी समाज माध्यमांद्वारे केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com