बेलापुरातून शेळ्या चोरीचे प्रमाण वाढले

पाच शेळ्यांची चोरी; चोरांचा तपास लावण्याची मागणी
बेलापुरातून शेळ्या चोरीचे प्रमाण वाढले

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर गावातून शेळ्या चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले असून यापूर्वी आठ शेळ्या चोरीस गेल्यानंतर मंगळवार दि. 15 रोजी पुन्हा पाच शेळ्या चोरीस गेल्या आहेत. दिवसाढवळ्या हा प्रकार घडत असून शेळीचोर सापडत नसल्याने शेळी पालन करणार्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत.

विजय शेलार 1 शेळी, अजय शेलार 1 शेळी तर राजू सय्यद यांच्या 3 शेळ्या घराजवळून चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी विजय शेलार यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी विजय शेलार यांचेसह सिराज कुरेशी, निसार सय्यद, नवाब शेख, फरान शेख यांनी शेळ्याचोरी बाबत बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली होती. त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समजते. मंगळवारी पुन्हा पाच शेळ्या चोरी गेल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. चारचाकी वाहनातून ही शेळ्याचोरी होत असल्याचे शेळीपालकांचे म्हणणे आहे.

दि. 27 जानेवारी रोजी गावातून एकाच वेळी सहा शेळ्या चोरीस गेल्या होत्या. त्या नंतर 4 फेब्रुवारी रोजी आणखी दोन शेळ्या चोरीस गेल्यानंतर 15 जून रोजी पुन्हा पाच शेळ्या चोरीला गेल्या आहेत. पोलिसांनी शेळ्या चोर शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी विजय शेलार, राजू सय्यद, अजय शेलार यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com