बेलापूर येथील खटोड बंधूंविरूद्ध गुन्हा दाखल

गुप्तधन खोदणार्‍या कामगाराच्या आत्महत्येप्रकरणी
बेलापूर येथील खटोड बंधूंविरूद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी 11 लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन ते देण्यास नकार दिला. तसेच मानसिक व शारिरीक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बेलापूरच्या खटोड बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील गायकवाड याने चार दिवसांपूर्वी राहते घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

कै. सुनील गायकवाड याची पत्नी वंदना गायकवाड यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, माझे पती सुनील गायकवाड हे दोन मजुरांसोबत राजेश व हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजूस मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते. काम संपवून घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस खड्डा खोदत असताना एक तांब्याचा हंडा सापडला. त्यात वर चांदी व खाली सोने होते. हंडा पूर्णपणे भरलेला होता. खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागल्यानेे त्यातील नाणी खाली पडली. नाण्यांना हात न लावता ती फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली. हंडा सापडला असल्याचे राजेश व हनुमंत खटोड यांना सांगितले. ते दोघेही तेथे आले. त्यातील सोने व चांदीची नाणी पाहून राजेश व हनुमंत खटोड यांनी सांगितले की, सदरील हंडा सापडल्याचे कुणाला सांगू नको, तुला 11 लाख रुपये देतो. पैकी 1 लाख 28 हजार रुपये रोख दिले.

दिलेल्या आश्वासनानुसार राहिलेले पैसे मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे गेले. त्यावेळेस राजेश व हनुमंत खटोड यांनी पतीला पैसे न देता शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार पतीने घरी सांगितला. त्यानंतरही त्या दोघांना वेळोवेळी पैसे मागितले असता, त्यांनी माझे पतीला तुला काम मिळू देणार नाही, तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून भीक मागायला लावू, अशी धमकी दिली. त्यानंतर पतीने घरी आल्यानंतर मला सांगितले. तेव्हापासून माझे पती घरी कुणासोबत बोलत नसत. सदरील लोकांना घाबारून घरातच बसून राहत.

गुप्तधनाचा गावभर बोभाटा झाल्याने तहसीलदार यांनी गुप्तधनाचा पंचनामा करून ते जप्त केले. त्यानंतर जेव्हा राजेश खटोड व माझे पतीची भेट झाली त्यावेळेस राजेश खटोड माझे पतीला म्हणायचा, तुझ्यामुळे आम्हाला वडीलोपार्जित धन शासनाला जमा करावे लागले, तुच ही बातमी सर्वांना सांगितली, तुला आता तुझी अवकात दाखवितो, असे म्हणून पतीला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला होता. तेव्हापासून माझे पती मानसिक तणावाखाली होते. भितीपोटी तसेच मानसिक, शारिरीक छळाला कंटाळून माझे पती सुनील गायकवाड यांनी आत्महत्या केली असून खटोड हेच माझ्या पतीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी वंदना सुुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राजेश खटोड व हनुमंत खटोड या दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 621/2021 नुसार भादंवि कलम 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com