
बेलापुर|वार्ताहर|belapur
एका खासगी कंपनीत काम करणार्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले असता त्यांच्या एकाच कुटुंबातील नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
तसेच याच कुटुंबात अलीकडेच दुःखद घटना घडल्याने अनेकांचा त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे गाव आणि परिसरात घबराट पसरली आहे. त्यामुळे आणखीही रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन निःसंकोचपणे आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत जमधडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.देविदास चोखर यांनी केले आहे.
एका करोना बाधित रुग्णावर उपचार करणार्या स्थानिक डॉक्टरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तपासलेला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या डॉक्टरने स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. त्यांचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांत गावातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला भाग 200 मीटर अंतरात सील केल्यानंतर तेथील सर्व व्यवहार काटेकोरपणे बंद ठेवणे गरजेचे आहे.
तरीही तेथील अनेकजण बिनधास्तपणे बाहेर ये-जा करतात तसेच तेथील दुकाने सुरू ठेवतात, सिलचे अंतर कमी करतात त्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो,अशी स्थानिकांची तक्रार आहे. या कारणावरून करोना समितीशी अनेकांचे अकारण वादही होत आहेत.
आतापर्यंत गावात एकूण 21 रुग्ण बाधित झाले असून काही बरे होऊन घरी आले आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. दरम्यान सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासन आणि करोना समितीच्यावतीने करण्यात आले आहे.