बेलापूर परिसरातील औद्योगिक इमारतीच्या बांधकामावर टाच

गटविकास अधिकार्‍यांकडून बांधकाम परवाना रद्द
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर-ऐनतपूर परिसरात तुकाराम नगर येथे सुरू असलेले औद्योगिक इमारतीचे बांधकाम आराखड्यानुसार नसल्याचे आढळून आल्याने

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सदर बांधकामाचा परवाना रद्द केला आहे. यासंदर्भात आभाळे यांनी बेलापूर ग्रामपंचायतीला पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

बेलापूर येथील तुकाराम नगर (बंगाळवस्ती) येथे नागरी वसाहत परिसरात योगेश भगिरथ मुंडलिक यांनी पंचायत समितीकडे औद्योगिक इमारत बांधण्यासाठी परवाना मागितला होता. गेल्या वर्षी तत्कालीन अधिकार्‍यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर मुंडलिक यांनी बांधकामास प्रारंभ केला.

स्थानिक ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शवत ग्रामपंचायतीसह पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी आभाळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. शाखा अभियंता बी. एस. भालेराव यांनी बांधकामास भेट देऊन पहाणी केली.

त्यावेळी मुंडलिक यांनी मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे समोर आले. आराखड्यात नमूद केल्यानुसार बाजूचे अंतर सोडलेले नसून बांधकामाचे क्षेत्र आराखड्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंडलिक यांनी मंजूर आराखड्यातील तरतुदीनुसार सदर बांधकाम केले नसल्याचा आहवाल भालेराव यांनी आभाळे यांना दिला.

पंचायत समितीने निवासी प्रयोजनासाठी बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. परंतु सदरचे बांधकाम औद्योगिक कारणासाठी होत असून ते तातडीने बंद करण्यात यावे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

भालेराव यांनी सादर केलेल्या अहवालात आराखड्यानुसार बांधकाम केलेले नसल्याचे निदर्शनास येत असल्याने मुंडलीक यांना दिलेली बांधकामाची परवानागी रद्द केल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली. ग्रामस्थांच्यावतीने भास्कर बंगाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली होती.

नागरी वसाहतीमध्ये औद्योगिक इमारतीचे बांधकाम करून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे सदरच्या औद्योगिक व्यवसायावर बंदी आणावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या मागणीचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयास ऑनलाईन स्वरुपात पाठविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com