बेलपिंपळगाव गटात इच्छुकांची थेट नेतेमंडळींकडे सेटींग

गट फेररचना व आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा; सर्वच पुढार्‍यांसाठी गट प्रतिष्ठेचा
बेलपिंपळगाव गटात इच्छुकांची थेट नेतेमंडळींकडे सेटींग

सलाबतपूर | Salabatpur

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यास काही अवधी उरला असल्याने तसेच गटनिहाय फेररचना व उमेदवार आरक्षण निघणे बाकी असल्याने नेत्यांसह कार्यकर्ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असले तरी बेलपिंपळगाव गटात जर तरच्या आशेवर इच्छुकांकडून भेटीगाठी बैठका व सोशलच्या माध्यमातून जनसंपर्क तर नेत्यांकडे थेट सेटिंग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्यावेळी बेलपिंपळगाव गट हा सर्वसाधारणसाठी राखीव होता. हा गट जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मागील निवडणुकीत तालुक्यातील इतर गटांबरोबरच त्यावेळी क्रांतिकारी गटाच्या माध्यमातून आपला सवतासुभा उभा करत नामदार शंकरराव गडाख यांनी बेळपिंपळगाव गटाबरोबरच या गटातील दोन्ही गणांवरही निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.

गणांतही बेलपिंपळगाव गण हा सर्वसाधारण पुरुष तर सलाबतपूर गण हा महिलांसाठी राखीव होता. सलाबतपूर गणातून चार महिलांनी आपले नशीब अजमावले होते. बेलपिंपळगाव गणातून अपक्षासह पाच पुरुषांनी निवडणूक लढवली होती. गटातून क्रांतीकारी पक्षातून दादासाहेब शेळके यांना 10709 मते मिळाली होती. भाजपाचे उमेदवार एकनाथ भगत यांना 8064 मते मिळवण्यात यशस्वी ठरले होते. राष्ट्रवादीचे अशोकराव शेळके यांना 2236 मते मिळाली होती. शिवसेनेचे हरिभाऊ शेळके 1647 तर रासपचे विजय शंकर गायकवाड 400 तसेच अपक्ष उमेदवार गणपत मोरे यांना 416 मते मिळाली होती.

बेलपिंपळगाव गणातून रवींद्र शेरकर हे विजयी झाले तर सलाबतपूर गणातून सविता कैलास झगरे विजयी झाल्या होत्या.

नामदार शंकरराव गडाख यांनी त्यावेळी अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतच विधानसभा निवडणुकींच्या नांदीला सुरुवात केली होती. त्याचे थेट परिणाम सर्वांना दिसूनही आले. विठ्ठलराव लंघे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कुकाणा गटातून आपल्या कन्येसाठी फिल्डिंग लावली होती. कुकाणा गट हा महिलांसाठी राखीव होता. यावेळी मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला काही अवधी राहिला असून जर-तरच्या आशेवर अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी असल्याचे जाणवत असल्याने करोनाबाबतचे नियम शिथील केले गेले आहे. त्यातच सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपत आल्याने सर्वत्र निवडणुकांचा विषय चर्चीला जाऊ लागला आहे.

नेवासा तालुक्यात मागील पंचवार्षिक पर्यंत सात गट व चौदा गण अस्तित्वात होते. आता एक गट व दोन गण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. त्यातच आणखी गण आणि गटाचे आरक्षण निघणे बाकी असल्याने कोणाचा हिरमोड आणि कोणाची लॉटरी लागणार हा ही विषय महत्वाचा ठरणार आहे.

बेलपिंपळगाव गट हा राजकियदृष्टया महत्वाचा मानला जातो. माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे यांनीही या गटाचे नेत्वृत्व केले. तर मागील पंचवार्षिकला लंघे यांनी उमेदवारी न करता कन्या तेजश्री यांना कुकाणा गटातून विजयी केले. त्यामुळे या गटात क्रांतीकारी, शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत पाहावयास मिळाली. मात्र नामदार शंकरराव गडाख यांना विधानसभा निवडणुकीचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी राजकीय पटलावर आपली ताकद अजमवताना सर्वच अस्त्रे पणाला लावली होती. तसे यशही प्राप्त केले. बेलपिंपळगाव गटावर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. तर त्यांचे बंधू प्रशांत गडाख हेही या गटावर विशेष लक्ष ठेऊन होते.

आरक्षण काही असलं तरी लंघे पुढील राजकिय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कुकाणा गटाबरोबर बेलपिंपळगाव गटावरही पकड ठेवण्याचा प्रयत्न करणार तर ना. गडाख यांचेही या गटाकडे विशेष लक्ष असणार हेही तितकंच खरं.

बेलपिंपळगाव गटातून उमेदवारी करण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी आरक्षणाचा घाट अद्याप आडवा असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता गटातील बदल आणि आरक्षण याकडे लागल्या आहेत. जर बेलपिंपळगाव गटातच बदल झाला तर तो कसा होइल. कोणती गावे कुठे जोडली जातील? कोणती गावे तोडली जातील? याचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला होइल? असे अनेक प्रश्नांवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक प्रवर्गातील कार्यकर्त्यांनी आरक्षण आपल्यासाठी निघेल या आशेवर तयारी सुरु केली असून काहींची चाचपणी सुरू आहे. त्यातच मंत्री गडाखांचा तालुक्याबरोबरच या गटातही विकासकामांच्या भूमिपुजनाचा सपाटा सुरू आहे. तर मुरकुटे लंघे यांच्याही कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे आरक्षण काय असेल कोणत्या पक्षाची उमेदवारी कोण करेल तसेच गटाची रचना कशी होणार? या प्रश्नांवर सध्या चर्चा होत असली तरी राजकियदृष्टया दोन आजी माजी नामदार व एक माजी आमदार या राजकिय आखाड्यात असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असल्याने सर्वा्ंच्या नजरा या होणार्‍या निवडणुकीकडे लागल्या आहेत.

गटावर राहणार सर्वांचेच लक्ष

यावेळी तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे आहे. लंघेंनी राष्ट्रवादीला सोडून पुन्हा भाजपाशी घरोबा केला. त्यामुळे विठ्ठलराव लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ही जोडगोळी एकत्र आली. याचा भाजपाला तालुक्यात किती फायदा होतो हे काळच ठरवणार आहे. तर मंत्रीपदाच्या माध्यमातून नामदार गडाख यांची ताकद वाढली आहे. त्यातच गडाख-घुले एकमेकांचे सोयरे झाल्याने गडाखांना राजकिय फायदा किती होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आरक्षण काही असलं तरी लंघे पुढील राजकिय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कुकाणा गटाबरोबरच बेलपिंपळगाव गटावरही पकड ठेवण्याचा प्रयत्न करतील तर ना. गडाख यांचेही या गटाकडे विशेष लक्ष असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com