उड्डाणपूलाआधीच नामकरणाचे उड्डाण... राष्ट्रवादीची राजकीय चतुराई

उड्डाणपूलाआधीच नामकरणाचे उड्डाण... राष्ट्रवादीची राजकीय चतुराई

अहमदनगर | ahmednagar (प्रतिनिधी) -

राष्ट्रवादीने नगर शहरातील उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल’ (Chhatrapati Shivaji Maharaj flyover) असे नामकरण केले आहे. राष्ट्रवादीकडून झालेल्या या अचानक कृतीमुळे त्यांच्या मित्रपक्षांसह विरोधकांनाही धक्का दिला आहे.

( ahmednagar city flyover ) उड्डाणपूलास शिवाजी महाराज यांचे नाव देण्यास कोणाचाही आक्षेप असणार नाही, याची जाणीव असल्याने राष्ट्रवादीने ( Nationalist congress party) नामकरणाचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी नारळ फोडून घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अन्य पक्ष याबाबत काय भुमिका घेणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

यश पॅलेस ते डीएसपी चौक (Yash Palace to DSP Chowk) दरम्यान होत असलेल्या उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुने बस स्थानक (Old bus station) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डणपूलाच्या नामकरण फलकाचे राष्ट्रवादीने अनावरण करत नारळ फोडले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारूडकर, अमोल कांडेकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव म्हस्के, शहानवाझ शेख, सुफियान शेख, वसिम शेख, मिजान कुरेशी, संतोष हजारे, अजय गुंड पाटील, जाकिर शेख, हाफिज शेख, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलने उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपूलाचे जाहीर नामकरण करण्यात आले, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूलाचे नामकरण करण्यात आले, असे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांच नांव उड्डाणपूलास देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर त्याला विनाविलंब मंजूरी देण्याची गरज होती. मात्र नगरकरांच्या वतीने या उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले असून, संबंधित खात्याने देखील हे नामकरण अधिकृत घोषित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने दाखवलेली ही चतुराई राजकीय असल्याचे मानले जात आहे. आमदार जगताप यांच्या सुचनेवरून हे घडल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगीतल्याने प्रकरण पडद्याआड राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलावरून अनेक पक्ष आणि नेत्यांचे राजकारण गेले आहे. सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. नामकरण टाळल्याबद्दल राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला आणि सरकारलाही जबाबदार धरल्याने आपल्या सरकारविरोधातील राष्ट्रवादीची भुमिका चर्चेत आहे.

शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचे नाव उड्डाणपूलास देणे ही प्रत्येक नागरिकांची इच्छा होती. शासनाने याची दखल घेतली नाही. नगरकरांची इच्छा राष्ट्रवादीने पूर्ण केली आहे.

- साहेबान जहागीरदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com