दिवाळीपूर्वीच शिर्डी विश्वस्तांचा कोरम पूर्ण

शिवसेनेकडून होणार्‍या नियुक्तीकडे लक्ष
दिवाळीपूर्वीच शिर्डी विश्वस्तांचा कोरम पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

न्यायालयाच्या फेर्‍यात अडकलेल्या शिर्डी विश्वस्तांचा अपुर्ण कोरम दिवाळीपूर्वी पूर्ण केला जाईल. शिवसेनेच्या कोट्यातील रिक्त जागांवर विश्वस्तांची नियुक्ती केली जाणार असून याबाबतच्या हालचाली शासन दरबारी सुरू आहेत. दरम्यान, 28 ऑक्टोबरला औरंगाबाद खंडपीठात नव्या विश्वस्त मंडळाच्या पदभरावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच ही नियुक्ती करून विश्वस्तांचा कोरम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादीने 11 विश्वस्तांच्या नियुक्ती करताना राष्ट्रवादीचे आ. अशुतोष काळे यांना अध्यक्ष केले आहे. मात्र, 5 जागा अजूनही रिक्त आहेत. शिवसेनेने मुंबईतील दोघांची नियुक्ती केली, तसेच नवीन विश्वस्त नियुक्ती करतांना कोणत्या प्रवर्गातून कोण याची माहिती दिली नाही.

त्यामुळे उत्तमराव शेळके यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी आहे. त्या सुनावणीपूर्वीच सरकारकडून शिर्डीत संस्थानच्या विश्वस्तांचा कोरम पूर्ण केला जाणार आहे. शिवसेना तीन विश्वस्त नियुक्त करणार असून त्यात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

सुनावणी बाकी

आ. आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी पदभार घेतला, पण तदर्थ समितीला न सांगता पदभार घेतल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त करत त्यांना कामकाज पाहण्यास मनाई केली आहे. त्याविरोधात अध्यक्ष आ. काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तेथील सुनावणी अद्याप झालेली नाही. तदर्थ समितीला विचारून पदभार घ्यावा, असा कोणताच नियम नसल्याचे आ. काळे यांचा दावा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com