गोमांस विक्रेत्यांवर तोफखाना पोलिसांचे छापे

सर्जेपुरा भागात दोघांना पकडले || 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
गोमांस विक्रेत्यांवर तोफखाना पोलिसांचे छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महावीर जयंती दिवशी कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना देखील गोमांस विक्री सुरूच होती. त्यावर तोफखाना पोलिसांनी छापेमारी केली. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 20 हजार 400 रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे.

कैलारू, शेमशेर बाजार, सर्जेपुरा येथे एका गाळ्यामध्ये इमरान मोहंमद हनीफ कुरेशी (वय 38 रा. तांबोळी किराणा स्टोर जवळ, झेंडीगेट) हा गोवंश जातीची मांस विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून 40 किलो गोमांस, एक लोखंडी वजनी काटा, एक धारदार कुर्‍हाड असा 10 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याच परिसरात रिजवान मुश्ताक बैवपारी (वय 22 रा. तांबोळी किराणा स्टोर जवळ, झेंडीगेट) हा गोमांस विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडूनही 40 किलो गोमांस, एक वजनी काटा व एक लोखंडी सत्तर जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार डी. बी. जपे, सुनील शिरसाठ, अविनाश वाकचौरे, वसिमखान पठाण, अहमद इनामदार, संदीप धामणे, सुरज वाबळे, सचिन जगताप, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, गौतम सातपुते यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com