
आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर शहरात गोमांसची तस्करी होत असल्याच्या घटना नियमित उजेडात येत असतात. त्याप्रमाणे तालुक्यातील ग्रामीण भागातही गोमांस तस्करीच्या घटना उघडकीस येण्यास सुरवात झाली असून शुक्रवारी आश्वी पोलिसांनी एकाला गोमांस विक्रीसाठी घेऊन जाताना पकडले आहे.
याबाबत पोलीस नाईक प्रविण दैमिवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रतापपूर - दाढ बुद्रूक रस्त्यावरुन गोमांसची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सूचना मिळताच पोलीस हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक विनोद गंभिरे, चालक पोलीस नाईक शांताराम झोडगे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत प्रतापपूर - दाढ रस्त्यावर जाऊन थांबले.
यावेळी गाडीवर जाणार्या एका व्यक्तीचा संशय आल्यामुळे त्याला थांबवून चौकशी केली असता अलिम रमजान ईनामदार (वय 27, रा. दाढ बुद्रूक, ता. राहाता) हा त्याच्या गाडीवरील पिशवीमध्ये 1 हजार 820 रुपये किमतीचे 13 किलो गोमांस आढळून आले. त्यामुळे याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता फईम (पुर्ण नाव माहीत नाही रा. कसईवाडा, संगमनेर) याच्याकडून हे गोमांस आणल्याची माहिती त्याने दिली. तर पोलीस नाईक विनोद गंभिरे यांनी पशुधन विकास अधिकारी यांना गोमांस तपासणीचे पत्र देऊन पंचनामा केला आहे. तर 15000 रुपये किमतीची बजाज कंपनीची काळ्या रंगाची सीटी 100 दुचाकी ताब्यात घेतली आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात अलिम ईनामदार व फईम यांच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 85/2022 नुसार भारतीय दंड संहिता कलम 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1965 चे सुधारित कलम 2015 चे कलम 5(ब), 5(क), 9, 9(अ), 9 (ब), 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेख करत आहे.