चार हजार किलो गोमांस पकडले

एलसीबीची कारवाई || दोघांवर गुन्हा, एक अटकेत
चार हजार किलो गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जातीचे चार हजार किलो गोमांस व एक आयशर टेम्पो असा एकूण 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. ही कारवाई नगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, संदीप दरंदले, विजय धनेधर, कमलेश पाथरूट यांच्या पथकाने ही कारवाई केली. तौफीक युनूस कुरेशी (रा. नगर) हा त्याच्या हस्तकामार्फत आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अकबरनगरच्या समोर ए.बी. फॅब्रीकेशनच्या समोर उभा आहे, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

त्यांच्या सूचनेवरून कारवाईसाठी पथक तात्काळ रवाना झाले. लाल रंगाची आयशर गाडी (एमएच 04 जेयु 2101) ही उभी दिसली. एकास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता, मुझफर आयूब शेख (वय 32, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगितले. आयशर टेम्पोच्या पाठीमगील हौदाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरांचे गोमांस हे बर्फामध्ये दिसले.

त्यास गोमांसाबाबत विचारले असता, गोमांस हे तौफीक युनूस कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, सुभेदार वस्ती, नगर) याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. सहा लाख रुपये किंमतीचे चार हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. अंमलदार पाथरूट यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com