पोलिसांनी पकडलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास मनपाकडून टाळाटाळ

मनपा व पोलीस अधिकार्‍यांत खडाजंगी
पोलिसांनी पकडलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास मनपाकडून टाळाटाळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास महापालिकेकडून टाळाटाळ होत असल्याने व परिणामी पोलीस ठाण्याच्या आवारात दुर्गंधी सुटल्याने संतापलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सोमवारी दुपारी मनपा मुख्यालय गाठले. तेथे स्वच्छता निरीक्षक परिक्षीत बीडकर व साळवे यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर उपायुक्त यशवंत डांगे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली.

पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर पंचनामा होऊन त्या गोमांसची विल्हेवाट मनपाच्या बुरूडगाव डेपोतील प्रकल्पात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनपाचे तेथील कर्मचारी व अधिकारी गोमांसची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडून केली जात आहे. रविवारपासून तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आलेले व गोमांस भरलेले वाहन उभे होते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांशी संपर्क साधला जात होता.

मात्र, मनपाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने व परिणामी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दुर्गंधी सुटल्याने संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक साळवे यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले. मनपा आवारातच निरीक्षक साळवे व बीडकर यांच्यात खडाजंगी उडाली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे व विभाग प्रमुख किशोर देशमुख हेही उपस्थित होते. उपायुक्त डांगे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली. दरम्यान, या प्रकाराची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com